Premium

ठाण्यात तीन डब्यांची मेट्रो; केंद्र सरकारची महापालिकेला सूचना

ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे महापालिकेने शहरातील अंतर्गत भागासाठी आखलेल्या मेट्रो मार्गावर तीन डब्यांची मेट्रो असावी, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे.

metro
(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

जयेश सामंत / नीलेश पानमंद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे महापालिकेने शहरातील अंतर्गत भागासाठी आखलेल्या मेट्रो मार्गावर तीन डब्यांची मेट्रो असावी, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. सहा डब्यांच्या मेट्रोसाठी प्रकल्पाचा खर्चही  वाढणार आहे. त्यामुळे तीन डब्यांच्या मेट्रोचा प्रकल्प करा, अशी सूचना केंद्राकडून आली आहे. मात्र महापालिकेने सहा डब्यांच्या मेट्रोसाठी आग्रह कायम ठेवला आहे.

ठाणेकरांना वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध होईल यासाठी ठाणे महापालिकेने अंतर्गत मेट्रो प्रकल्प उभारणीचा निर्णय घेतला आहे. यासाठी महामेट्रोची (महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड) मदत घेण्यात आली आहे. दरम्यान, केंद्र राज्य शासनाच्या सूचनेनुसार महापालिकेने मध्यंतरी या प्रकल्पाचा सुधारित प्रस्ताव तयार केला आहे. मेट्रोच्या साहित्याची निर्मिती भारतात होऊ लागली असून त्याचे दरही कमी आहेत. त्यामुळे सुधारित प्रस्तावात मेट्रो प्रकल्पासाठी १० हजार ४१२ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला असून त्यात सहा डब्यांची मेट्रो प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर केंद्राकडून यासाठी निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

खर्चही कमी..

अंतर्गत मेट्रोचा सुधारित प्रस्ताव केंद्र सरकारच्या गृहनिर्माण शहरी कामकाज मंत्रालय विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. हा प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी केंद्र सरकारला पत्र दिले होते. त्यानंतर केंद्रातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठाणे शहरात येऊन प्रकल्पाची पाहाणी केली होती. दरम्यान, केंद्र सरकारच्या गृहनिर्माण शहरी कामकाज मंत्रालय विभागाने पालिकेला नुकतेच एक पत्र पाठविले असून त्यात शहरातील प्रवासी संख्येनुसार तीन डब्यांची मेट्रो करण्याची सूचना केली आहे. मोठय़ा शहरांमध्ये तीन मिनिटांच्या अंतराने मेट्रो चालविण्यात येते. ठाण्यात तीन डब्यांची मेट्रो करून ती दीड मिनिटाच्या अंतराने चालविण्याची सूचना केंद्राने केली आहे. असे केल्यास प्रकल्पाचा खर्चही कमी होऊ शकेल, असे केंद्राचे म्हणणे आहे.

सहा डब्यांसाठी आग्रह

केंद्र सरकारची तीन डब्यांची सूचना महापालिकेच्या पचनी पडलेली नाही. यासंबंधी महामेट्रो आणि महापालिका प्रशासनाने केंद्र सरकारला पत्र पाठविले असून त्यामध्ये सहा डब्यांचा मेट्रो प्रकल्प मंजूर करावा, असा आग्रह धरला आहे. सहा डब्यांची मेट्रो शक्य नसेल तर किमान सहा डब्यांच्या मेट्रोइतकी यंत्रणा उभारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. 

केंद्र शासनाने सहाऐवजी तीन डब्यांची मेट्रो करण्याचे पत्र दिले आहे; परंतु भविष्यातील प्रवासी संख्येचा विचार करता सहा डब्यांची मेट्रो करण्याचा आणि ते शक्य नसेल तर किमान सहा डब्यांच्या मेट्रोइतकी यंत्रणा उभारण्यात यावी, असे महामेट्रो आणि आम्ही संबंधित यंत्रणांना कळविले आहे. – अभिजीत बांगर, आयुक्त, ठाणे महापालिका

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three coach metro in thane notification of the central government to the municipal corporation ysh

First published on: 11-09-2023 at 03:42 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा