विरारमधील बोळींज येथील घरे महाग असल्याने ग्राहक नसल्याचा ठपका
विरारमधील बोळींज येथील गृहनिर्माण प्रकल्पासाठीच्या भूखंडावर मुस्लीम धर्मीयांच्या कब्रस्थानसाठी जागा आरक्षित करण्याचा वसई-विरार महापालिकेच्या निर्णयामुळे सुरू झालेला संघर्ष आणखी वाढला आहे. गृहप्रकल्पाच्या जागेवर पालिकेने दफनभूमीचे आरक्षण टाकल्याने घरांच्या सोडतीवर परिणाम होत असल्याचा म्हाडाच्या आरोपावर पलटवार करत ‘म्हाडाची घरे महाग असल्याने ग्राहक त्याकडे पाठ फिरवीत आहेत,’ असा आरोप वसई-विरार महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. मुळात म्हाडाच्या जागेवर स्मशानभूमी होती तीे शासनाने का बदलायला लावली, असा सवाल वसई-विरार महापालिकेने केला आहे.
म्हाडाचा विरारच्या बोळींज येथे गृहनिर्माण प्रकल्प होत आहे. मात्र या जागेवर वसई-विरार महापालिकेने दफनभूमीचे आरक्षण टाकले आहे. या दफनभूमीमुळे रहिवाशांच्या ५६० सदनिका म्हणजेच ३ इमारती रद्द कराव्या लागणार आहेत, असा आरोप म्हाडाने केला आहे. आता पालिका या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी पुढे आलीे आहे. मुळात या जागेवर आधी िहंदूंच्या स्मशानभूमीचे आरक्षण होते. विकास आराखडा बनवताना ते कुणी हटवले, असा सवाल स्थायी समितीचे माजी सभापती आणि सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे नेते अजीव पाटील यांनी केला आहे. दफनभूमीचे आरक्षण आल्यानंतर तेथील एफएसआय म्हाडाला मिळणार आहे आणि त्यावर इमारती उभ्या राहतील. त्यामुळे रहिवाशांचे नुकसान होणार नाही, असे ते म्हणाले. ग्रामपंचायतींच्या ज्या जागांवर म्हाडाने आरक्षण टाकले त्याबाबत म्हाडाने मौन का बाळगले, असा सवालही त्यांनी केला आहे. म्हाडा जनतेची दिशाभूल करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
दफनभूमीचे आरक्षण पालिकेने हटवले हे खरे असले तरी पूर्वीची जागा अत्यंत गैरसोयीची होती. ती जागा विरार रेल्वे कारशेडजवळ होती. तेथून नागरिकांना जाणे अत्यंत गैरसोयीचे ठरणार होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

म्हाडाची घरे महाग
बोळींज येथे पात्र झालेल्या १३० ग्राहकांनी आपल्या सदनिका म्हाडाला परत केल्या आहेत, कारण या सदनिका बाजारभावापेक्षा महाग असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. मीरा रोड येथेही तीच परिस्थिती होती. विरारमध्ये अन्य ठिकाणी म्हाडापेक्षा कमी किमतीत घरे मिळत असताना लोक म्हाडाची घरे का घेतील, असा सवालही त्यांनी केला.