मुख्याध्यापक संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनवेळी पालकमंत्र्यांचे आश्वासन
जनगणना आणि निवडणूक कामांच्या ओझ्यामुळे शिक्षकांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ नये, म्हणून त्यांच्यावरील अतिरिक्त कामांचे ओझे कमी करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. त्यासाठी आपण स्वत: मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचित केले.
राज्यस्तरीय मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या ५५व्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी बोलत होते. बदलापुरात तीन दिवस चाललेल्या या अधिवेशनात राज्यातून आलेले शिक्षक व माजी मंत्री पतंगराव कदम व अन्य मान्यवर उपस्थित होते.
शिंदे पुढे म्हणाले की, शिक्षकांना देण्यात येत असलेली शिक्षकेतर कामे कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असून, आगामी हिवाळी अधिवेशनात शिक्षकांचे हे प्रश्न मांडून ते सोडवण्याच्या दृष्टीने ठोस पावले टाकण्यात येतील. यावेळी अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी आयोजक व ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे, अंबरनाथच्या नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, बदलापूरचे नगराध्यक्ष वामन म्हात्रे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे सचिव विजयकुमार गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

भाजपच्या मंत्र्यांची दांडी
या राज्यस्तरीय अधिवेशनाला शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे व आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा या भाजपच्या मंत्र्यांनी दांडी मारल्याने शिक्षकांचा हिरमोड झाला. त्यामुळे समारोप प्रसंगी उपस्थित असलेल्या पालकमंत्र्यांकडे त्यांनी मागण्यांचे निवेदन सादर केले.

तर राज्यातील शाळा बेमुदत बंद!
शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ८ आणि ९ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असून, शासनाने या अधिवेशनात आमच्या मागण्या मान्य न केल्यास राज्यातील सर्व शाळा बेमुदत बंद ठेवणार असून, ज्या निर्णयामुळे राज्यातील ४० टक्के मुख्याध्यापक अतिरिक्त ठरणार आहेत तो २८ ऑगस्ट २०१५चा शासनाचा निर्णय रद्द करावा, असा इशारा शिक्षक कृती समितीच्या वतीने इशारा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत देण्यात आला.