जागतिक आरोग्य संघटनेचे अनुवादित मराठी पुस्तक पडून

मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी हे पुस्तक तयार केले. या पुस्तकाची किंमत  पाचशे रुपये आहे.

Hospital Care for Children book
भारताच्या प्रादेशिक भाषेतील एकमेव पुस्तक

सामाजिक बांधीलकी म्हणून मोफत पुस्तके वाटणार

लहान मुलांवरील उपचारांसाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या  मराठी अनुवाद असलेल्या पुस्तकाच्या हजारो प्रति प्रतिसादाअभावी पडून आहेत. जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेली ही पुस्तके  सर्व मंत्री, आमदारांना पाठवूनही कुणी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे दहा हजार प्रति मोफत वाटण्याचे लेखकाने ठरवले आहे.

लहान मुलांवरील उपचारांसाठी आंतरराष्ट्रीय मागदर्शिका असलेले हॉस्पिटल केअर फॉर चिल्ड्रेन हे पुस्तक जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केले आहे. इंग्रजी व्यतिरिक्त हे पुस्तक १७ जागतिक भाषांमध्ये आहे. हे पुस्तक प्रादेशिक भाषेत आले तर बालकांवर उपचार करणे सोपे जाईल आणि कुपोषणाचा प्रश्न सुटेल या भावनेतून विरार येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत जोशी यांनी या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे हक्क मिळवले. वैद्यक भाषेतील हे पुस्तक असल्याने प्रकाशकांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे डॉ. जोशी यांनी स्वत: पुस्तक प्रकाशित केले. सुमारे १२ लाख रुपये खर्च करून त्यांनी या पुस्तकाच्या दहा हजार प्रति छापल्या. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी हे पुस्तक तयार केले. या पुस्तकाची किंमत  पाचशे रुपये आहे. परंतु हे पुस्तक कुणी घ्यायला तयार नव्हते. सामाजिक बांधीलकी म्हणून नफा न कमवता केवळ जनजागृती करण्यासाठी डॉ. जोशी यांनी हे पुस्तक बनवले होते. कुणी घेत नसल्याने त्यांनी जनजागृतीसाठी राज्यातील सर्व मंत्री, सचिव, सनदी अधिकारी, आमदार, खासदार, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदा, विविध स्वंयसेवी संघटना यांना मोफत प्रती देऊ  केल्या. मुख्यमंत्र्यांनी पुस्तक मिळाल्याची केवळ पोचपावती दिली. परंतु कुणी पुस्तके घेतली नाही. दहा महिन्यात १ हजार प्रति विनामूल्य वाटाव्या लागल्या. आता उर्वरित ९ हजार प्रति देखील विनामूल्य वाटणार  असल्याचे डॉक्टर जोशी यांनी सांगितले.

कुपोषणाचा प्रश्न सुटण्याचा दावा

हे भारताच्या प्रादेशिक भाषेतील एकमेव पुस्तक असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात दीड लाख परिचारिका, डॉक्टर राज्य सरकारच्या सेवेत आहेत. त्यांनी या पुस्तकाचा लाभ घेतला तर कुपोषणाचा प्रश्न चुटकीसरशी सरेल, असा दावा त्यांनी केला. मातृभाषेत वैद्यकीय शिक्षण नसल्याने आपल्याकडील डॉक्टर्स हुशार नसतात आणि त्यामुळे चांगली सेवा देऊ  शकत नाहीत असे ते म्हणाले. मराठी भाषेतील या पुस्तकामुळे उपचार करण्यास सोपे जाईल असा दावा त्यांनी केला. आता नऊ  हजार प्रती राज्यातील विविध वैद्यकीय संस्था, डॉक्टर्स यांना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: World health organization distribute hospital care for children book free

ताज्या बातम्या