शेकडो कुटुंबे घाणीच्या विळख्यात; मीरा-भाईंदर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

भाईंदर : करोनाच्या पार्श्वभूमीवर स्वछता राखण्यास प्राधान्य देण्यात येत असले तरी मीरा रोड येथील संक्रमण शिबिरात असलेली शेकडो कुटुंबे घाणीच्या विळख्यात अडकली  आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे आरोप स्थानिक नागरिकांनी केले आहेत.

महापालिका हद्दीतील काशीमीरा येथील जनता नगर व काशी चर्च झोपडपट्टीधारकांसाठी महापालिकेने २००९ मध्ये बीएसयूपी योजना मंजूर केली होती. या भागातील झोपडय़ा तोडून विस्थापित झालेल्या लोकांना नवीन इमारत तयार होईपर्यंत महापालिकेने पर्यायी व्यवस्था केली.  या योजनेतील काही रहिवाशांना घोडबंदर येथील १०० फुटांच्या संक्रमण शिबिरात तसेच काहींची एमएमआरडीएच्या पांडुरंगवाडी येथील इमारतीमध्ये राहण्याची पर्यायी व्यवस्था केली तर काहींना घर भाडय़ाने घेण्यासाठी प्रति महिना ३ हजार  रुपये भाडे देण्यात आले होते.

२००९ मध्ये सुरू झालेली योजना २०१२ मध्ये पूर्ण होणार होती. परंतु अजूनही योजना कधी पूर्ण होईल याची शाश्वती नाही. आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असणाऱ्या लोकांनी घोडबंदर येथील १०० फुटांच्या संक्रमण शिबिरात राहण्यास प्राधान्य दिले. अनेक गैरसोयी असलेल्या जागेत आज २००हून अधिक  कुटुंबे गेली ११ वर्षे राहात आहेत. ३ वर्षांत पूर्ण होणारा प्रकल्प ११ वर्षे झाली तरी अर्धवट अवस्थेत आहे. अजून किती वर्षे लागतील याची कल्पना नसल्याने त्या विस्थापित कुटुंबाचे भविष्य अंधारात आहे. महापालिकेने त्यांना सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असताना उलट संक्रमण शिबिराजवळच असलेले गटार नियमितपणे साफ केले जात नाही, परिसरातील कचरासुद्धा उचलला जात नाही. त्यामुळे नेहमीच दुर्गंधी पसरलेली असते.