वनस्पतींमधली ऑर्किडची दुनिया अगदी अफलातून आहे. जसं लहान मूल, असतं अगदी पिटुकलं, आईचा हात सोडून त्याला साधं उभं राहता येत नाही, पण आईच्या कमरेवर, बाबांच्या खांद्यावर बसून उंची गाठतं. ऑर्किडचंही अगदी असंच आहे. जमिनीतून कोंब फोडून वर येणं आणि उंच उंच वाढत जाणं त्याला पसंत नाही. डायरेक्ट यजमान झाडाच्या म्हणजे ज्या झाडाच्या अंधाराने ते वाढतंय त्या झाडाच्या कमरेवर, खांद्यावर, डोक्यावर बसून जग बघायला त्याला आवडतं. यजमान झाडालापण या आपल्या अंगावर वाढणाऱ्या जिवाला झिडकारून द्यावं असं वाटत नाही. कारण ऑर्किड किंवा ‘अमरी’ हे बांडगूळ नाही.

बांडगूळ स्वत: अन्न तयार करीत नाही. स्वत:ची मुळं यजमान झाडांत खुपसून वरती आधार दिलेल्या या झाडातून त्यांनी स्वत:साठी बनवलेलं अन्न शोषून घेतं. स्वत: काही कष्ट न करता फुकटात, यजमान झाडाच्या जिवावर जगतं आणि नंतर या झाडाच्या जिवावर उठतं.

ऑर्किड फक्त आधारासाठी मोठय़ा झाडांचा वापर करतात. सध्या ‘येऊर’च्या जंगलात ‘वाघेरी’ हे एक गुच्छा-गुच्छानी येणारं ऑर्किड फुललं आहे. त्याच्या नावावरून फुलांच्या रंगाविषयी आणि त्यावरील नक्षीविषयी तुम्ही अंदाज बांधला असेल आणि तो बरोबरच आहे. क्रीमिश-पिवळ्या रंगाच्या या फुलावर तांबडय़ा रंगाचे आडवे पट्टे आहेत. मधल्या पाकळीच्या दोन्ही बाजूंना वाघाचे उगारलेले पंजेपण दिसतात. एकंदरीत हे फूल आपल्याला वाघाची आठवण करून देतं, पण भीती नाही दाखवत. किती झालं तरी फूल ते. वाघासारखं असलं म्हणून काय झालं? पण तरीसुद्धा नाजूक हा फुलाच्या अनुषंगाने येणारा शब्द मात्र इथे लागू पडत नाही. आपल्याला नाजूक-मुलायम फुलं पाहायची सवय झाली आहे; पण वाघेरी फुलं म्हणजे त्यांच्या पाकळ्या एकदम कडक, ताठर आणि न लवणाऱ्या असतात. या वैशिष्टय़ावरूनच त्याला शास्त्रीय नाव मिळाले आहे अूेस्र्ी. याची लांब पात्यासारखी पाने चिवट-चामट असतात. त्याला मध्ये पन्हाळ असते. पानाच्या शेवटी खाच असते. त्यामुळे टोकाला पान ह डब्लू या आकारात दिसतं. तरीसुद्धा या डब्लूच्या दोन वेगळ्या झालेल्या भागांत सारखेपणा नाही. डब्लूमधील एक वळण थोडं वर आणि एक खाली. जेव्हा या ऑर्किडला फुलं नसतात तेव्हा या गुणवैशिष्टय़ावरूनच ही जात ओळखणं सोपं जातं.

आंबा-फणस अशा झाडांवर ‘वाघेरी’ हमखास सापडते, पण फुलं फुलल्याशिवाय खरी मजा नाही. एप्रिलमध्ये फुलं फुलायला सुरुवात होते आणि जुलैपर्यंत फुलतच राहतात. नंतर हळूहळू वाघेरीला ६ सें. मी. लांबीच्या सिगारेटसारख्या शेंगा लटकताना दिसतात. या शेंगा मातकट रंगाच्या पावडरीने गच्च भरलेल्या असतात. या पावडरीतच बिया असतात. ही पावडर वाऱ्यावर भुरुभुरु उडत राहते आणि बीजप्रसारणाच्या कामाला सुरुवात होते. बिया चिकट असतात. त्यामुळे झाडाच्या बुंध्यावर, झाडाच्या सालीच्या आत चिकटून बसतात. हळूहळू आपले पाय रोवतात. मुळे वाढली की हवेतील आद्र्रता शोषून घेतात. हवेतील बाष्प, प्राणवायू घेऊन वाढीला लागतात. कधी कधी काही पक्षी या शेंगांच्या आतला भाग खातात तेव्हा या चिकट बिया त्यांच्या चोचीला चिकटतात. चोच साफ करताना पक्षी ती कधी कधी बुंध्यावर घासतात आणि चोचीला चिकटलेली बी काढतात. बी चोचीवरून निघते आणि झाडाच्या बुंध्याला, फांदीत चिकटते. बीजप्रसारणाचं काम झालेलं असतं.

येऊरच्या जंगलात वाघेरीसारखी ऑर्किड फुललेली आहेत. ती अल्पायुषी असल्याने फार काळ टिकणारी नसतात. त्यांना जाणून घेण्यासाठी वृक्षप्रेमी मेधा कारखानीस यांनी नेचर-ट्रेलचे आयोजन केले आहे. हा ट्रेल २१ जून रोजी होत आहे. यात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.

संपर्क- मेधा कारखानीस

मो. : ९८२०१०१८६९