मधुमेही रुग्णांच्या शरीरातील आम्लाच्या प्रमाणावर लक्ष ठेवून पुरेशा प्रमाणात इन्शुलिन निर्मिती करणारे प्रत्यारोपण करता येईल असे उपकरण वैज्ञानिकांनी तयार केले आहे. टाइप १ डायबेटिस असलेल्या रुग्णांच्या शरीरात आम्लाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे इन्शुलिन हे रक्तशर्करेचे नियंत्रण करणारे संप्रेरक तयार होत नाही त्यामुळे त्यांच्या पेशी रक्तातील ग्लुकोज शोषून घेऊ शकत नाहीत व त्यांना साठलेल्या मेदांवर ऊर्जेसाठी अवलंबून राहावे लागते. जर इन्शुलिनचा अभाव वेळेत लक्षात आला नाही तर टाइप १ मधुमेह असलेले रुग्ण केटोअ‍ॅसिडोसिस या विकाराने मरतात. यात चयापचय क्रियेला जादाच्या बिटा हायड्रोक्झीब्यूरेटमुळे धक्का बसतो. इटीएच झुरीच डिपार्टमेंट ऑफ बायोसिस्टीम्स सायन्स अँड इंजिनियरिंग या संस्थेतील जैव अभियंत्यांनी प्रत्यारोपण करता येण्यासारखी रैणवीय यंत्र तयार केले आहे त्यात दोन रेणू असतात. एक संवेदकाचे काम करून रक्तातील पीएच प्रमाणावर लक्ष ठेवतो तर दुसरा योग्य प्रमाणात इन्शुलिन तयार होते आहे की नाही यावर लक्ष ठेवतो. जनुके, प्रथिने मूत्रपिंडाच्या पेशीत टाकून ही यंत्रणा तयार केली आहे. नंतर या विशिष्ट प्रकारे बनवलेल्या पेशी कॅप्सूलमध्ये बसवून शरीरात प्रत्यारोपित केल्या जातात. पीएच संवेदक हा या यंत्रणेचा मुख्य भाग असतो तो रक्ताची आम्लता तपासतो व आदर्श पीएच संख्येपासून ती किती कमी-जास्त आहे हे पाहतो. जर आम्लता ७.३५ पीएचपेक्षा कमी असेल तर इन्शुलिन तयार करण्याचा संदेश पाठवला जातो. रक्ताची आम्लता टाइप १ मधुमेहातच इतकी कमी असते. मद्य सेवनाने रक्ताचा पीएच घटतो किंवा व्यायामाने स्नायूंमधील आम्लता वाढते. ती ७.३५ पीएचच्या खाली जात नाही. या प्रत्यारोपणामुळे इन्शुलिन हे निरोगी पेशींमध्ये ग्लुकोज शोषून घेते व मेदावर अवलंबून न राहता शर्करेला उर्जास्त्रोत म्हणून वापरते व त्यामुळे रक्ताचे पीएच मूल्य पुन्हा वाढते. पीएच आदर्शवत होताच संवेदक बंद होतो व इन्शुलिन निर्मिती थांबते. या शोधाचा प्रयोग उंदरांवर करण्यात आला असून तो यशस्वी झाला आहे. आम्लतेच्या प्रमाणात या उंदरांमध्ये या कॅप्सूलच्या प्रत्यारोपणामुळे इन्शुलिनची निर्मिती झाली . माणसांमध्येही त्याचा वापर करता येणार आहे.