कुछ मिठा ज्ञान हो जाएं

सर्वच गोष्टींमध्ये वैश्विक बदलाचे वारे तीव्र वाहत असले, पाठच्या आणि पुढच्याही शतकामध्ये बदलणार नाही ती ‘चॉकलेट’ नामे उत्साहवर्धकाची जादू.

लहान मुलांच्या रडण्यावरचा अक्सीर उतारा आणि मोठय़ांच्या रुसव्या-फुगव्यावर महाऔषध म्हणून जगातील सर्वच राष्ट्रांमधील आबालवृद्ध ‘चॉकलेट’भक्त आहेत. दहा जणांपैकी कुणालाही चॉकलेट आवडते का विचाराल, तर नवांच्या प्रामाणिक आणि एकाच्या खोटय़ा विधानाला सामोरे जावे लागेल. कारण चॉकलेट नावडणारा जीव या जगात अजून जन्माला आला नाही. तोटय़ांचा पाढा वाचला, तरी चॉकलेटभक्ती संपू शकत नाही, इतके चॉकलेटमय जगत अस्तित्वात आहे. आता त्रिमिती तंत्रज्ञानाने कवितेतला चॉकलेटचा बंगला बांधणेही शक्य होत आहे. एवढेच काय, पण चॉकलेट हा एक विषय घेऊन डॉक्टरेट करण्याची संधीही केंब्रिज विद्यापीठाने दिली असून ही पदवी घेणाऱ्या व्यक्तीला ‘डॉक्टर ऑफ चॉकलेट’ असे संबोधले जाणार आहे. या निमित्ताने चॉकलेट ज्ञानविच्छेदन.

डॉक्टर ऑफ चॉकलेट
केंब्रिज विद्यापीठाने जास्त तापमानालाही कडक राहू शकेल असे चॉकलेट तयार करण्यासाठी साडेतीन वर्षांचा संशोधन प्रकल्प आखला असून जो कुणी असे चॉकलेट तयार करील त्याला ‘डॉक्टर ऑफ चॉकलेट’ ही पदवी मिळणार आहे. अनेकदा आपण नंतर खाऊ म्हणून चॉकलेट ठेवून देतो व ते वितळलेले असते. त्याचा वितलन बिंदू आपल्या शरीर तापमानाइतका असतो. जानेवारी २०१५ मध्ये कडक चॉकलेट बनवण्याचा हा संशोधन प्रकल्प सुरू होणार आहे, या प्रकल्पात युरोपीय विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. या प्रयोगाच्या यशस्वितेचा फायदा मात्र सर्व जगाला होणार आहे. चारेक वर्षांमध्ये नव्या प्रकारचे चॉकलेट सर्वाना पाहायला मिळेल. प्रयोग अयशस्वी झाला, तरी त्यातून संशोधकांच्या हाती चॉकलेट बनविण्याच्या प्रक्रियेविषयी, त्याच्या चवीविषयी किंवा घटकांविषयी काही नवी माहिती हाती लागेल. ज्याद्वारे चॉकलेटची चव
आणखी गोड होणार आहे.

चॉकलेट : एक पिण्याची गोष्ट!
तुम्ही आता चॉकलेट फ्रिजमध्ये मजबूत झाल्यानंतर दातांवर ठेवणे पसंत करता. चॉकलेटच्या शोधानंतर सुरुवातीची काही शतके मात्र तो पिण्याची गोष्ट म्हणूनच ओळखला जायचा. कोर्टेझ याने स्पेनच्या दरबारात १५२८मध्ये प्रथम कोको आणला. त्याच्यापासून केलेले पेय फार स्वादिष्ट लागत असे. १६१५मध्ये स्पेनमधील अ‍ॅनाचा विवाह पॅरिसचा राजा किंग लुई तेरावा याच्याशी झाला तेव्हा अ‍ॅनाने त्याला ड्रिंकिंग चॉकलेटची ओळख करून दिली. खरे तर चॉकलेट मुख्य घटक असलेल्या कोको बिन्स प्रत्यक्ष कोलंबसाने चारशे वर्षांपूर्वी बघितल्या होत्या. नंतर त्याचा प्रसार स्वित्र्झलडमध्ये झाला. चॉकलेट्समुळे स्वित्र्झलडला नवी ओळख दिली. त्यानंतर तेथे प्रॅलाईन्स, केक्स, मूस असे चॉकलेटचे अनेक प्रकार आले. १९व्या शतकात ड्रिंकिंग चॉकलेटचे महत्त्व कमी झाले व आताचे चॉकलेट अस्तित्वात आले. १८३०च्या नंतर असे चॉकलेट फ्रान्समध्ये पहिल्यांदा तयार झाले. त्याआधी म्हणजे १८१९ मध्ये चॉकलेटचा व्यवसाय सुरू झाला. स्वित्र्झलडमध्ये कोरसियर येथे फ्रँकाइस लुईस कैलर यांनी चॉकलेटचा पहिला कारखाना काढला, त्यानंतर हा देश चॉकलेट उत्पादनात आघाडीवर राहिला. डॅनियल पीटर यांनी १८६७ मध्ये चॉकलेटचा कारखाना सुरू करून चॉकलेट व दूध यांचे मिश्रण करून मिल्क चॉकलेट तयार केले. रुडॉल्फ लिंडट् यांनी १८७९मध्ये मेल्टिंग चॉकलेट तयार केले. स्वित्र्झलडमधील नेसले, क्राफ्ट फूड, फ्लॉविल, मायग्रॉस या कंपन्या नावारूपास आल्या. चॉकलेटचे उत्पादन व खप दोन्ही त्याच देशात अधिक आहे.

चॉकलेट कसे तयार होते?
चॉकलेटचे वैशिष्टय़ असे की, ते कुठलाही आकार, स्वाद, धारण करू शकते पण चॉकलेट जास्त काळ गरम वातावरणात राहिले तर वितळण्याचा धोका असतो. ते बनविण्यासाठी सुरुवातीला कोको बिन्स आंबवून ठेवले जातात. नंतर ते कोरडे करून उत्पादक कारखान्यांकडे नेले जातात. तेथे स्वच्छ करून ते भाजले जातात, त्यांची प्रतवारी केली जाते. नंतर त्यांची टरफले काढली जातात. त्यांचा गर काढून चॉकलेट दारू बनवतात. नंतर या चॉकलेट दारूला कोको बटरच्या मदतीने स्वाद दिला जातो. कोको बटर किती आहे यावरून त्याचे डार्क, मिल्क, व्हाईट, फाऊंटन असे मूलभूत प्रकार पडतात. पण काही उत्पादक वेगळा स्वाद तयार करून चॉकलेटचे नवे ब्रँड तयार करतात. चॉकलेट तयार करताना एक विशिष्ट भांडे घेऊन त्यात धातूच्या मोठय़ा गोळ्या टाकल्या जातात व त्यात चॉकलेटचा लगदा टाकून तो घर्षणाच्या उष्णतेने एकजीव केला जातो. सुमारे ७२ तास ही प्रक्रिया केली जाते, त्यामुळे चॉकलेट मऊ व जिभेवर विरघळेल असे बनते.  चॉकलेट हे साधारणपणे १५ ते १७ अंश तापमानाला व ५० टक्के आद्र्रतेला टिकून राहते. जेव्हा चॉकलेट वितळलेल्या अवस्थेत असते तेव्हा ते थंड करून स्फटिकीकरण करतात. त्यानंतर सहा पद्धतीचे स्फटिक बनतात, पण केवळ बिटा किंवा फॉर्म फाइव्ह नावाचे स्फटिक हे कडक होऊन चॉकलेट बनते, ते चमकदार असते. चॉकलेटमध्ये विविध स्वाद मिसळता येतात.

चॉकलेट ‘आरोग्यज्ञान’ फास्ट!
’चॉकलेटमध्ये कोको बिन्समध्ये वापरले गेलेले कोको बटर असते त्यामुळे चॉकलेटमध्ये मऊसूतपणा येतो.  स्टिअरिक आम्ल या कोको बटरमध्ये असते, तो संपृक्त मेदाचा प्रकार असतो, त्याचे प्रमाण एक तृतीयांश असते. पालमिटिक आम्ल, ओलेइक आम्ल हे इतर मेद घटक असतात. त्यामुळे एचडीएल व एलडीएल कोलेस्टेरॉल यांच्या गुणोत्तरात सकारात्मक फरक पडतो व त्याचा फायदा होतो. स्टिअरिक आम्ल एलडीएल या घातक कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते.
’चॉकलेट हे फळांच्या बियांपासून बनते, त्यामुळे त्यात तांबे, जस्त, लोह, तंतू हे पोषक घटक असतात. कोकोच्या बियांमध्ये फ्लॅवनॉल्स असतात, चॉकलेट कशा पद्धतीने तयार केले आहे यावर त्यातील फ्लॅवनॉल्सचे प्रमाण अवलंबून असते व त्यामुळे हृदयविकाराची शक्यता काही अंशी कमी होते, असे काही संशोधनांतील निष्कर्ष आहेत.

चॉकलेट नंतर वितळू नये यासाठी..
बोर्नव्हिटा जसे काही काळ ठेवले तर त्याच्या पावडरीचे रूपांतर घट्ट गोळ्यात होते, पण चॉकलेटच्या बाबतीत नेमके उलटे घडून ते वितळण्याची शक्यता असते. चॉकलेटचा वितळलेला रस थंड करून ते बनवलेले असते, त्यामुळे तापमान वाढताच ते परत वितळू लागते. नोव्हेंबर २०१२ मध्ये डेली मेलमध्ये आलेल्या बातमीनुसार डेअरी मिल्कने तीन तास ४० अंश तापमानाला राहिले तरी न वितळणारे चॉकलेट तयार करण्यात यश मिळवले.कॅडबरीचा संशोधन प्रकल्प बर्मिगहॅमजवळ बोर्नव्हिल येथे आहे. जर चॉकलेट थोडय़ा जास्त तापमानाला वितळू नये असे वाटत असेल तर काँचिंग म्हणजे धातूच्या गोळ्यांच्या चाळणीत ते फिरवल्यानंतर त्याचे आणखी शुद्धीकरण केले जाते. जास्त तापमानाला टिकू शकेल असे चॉकलेट तयार करणे हे उत्पादकांसमोरचे आव्हान आहे.  भारत व ब्राझीलमध्ये जास्त तापमानाला टिकणारी चॉकलेट्स उपलब्ध करण्याचा कंपनीचा इरादा आहे, पण त्यावर ब्रिटनमध्ये टीका झाली. काही चॉकलेट कंपन्यांच्या मते कॅडबरीने तयार केलेले जास्त तापमानाला घट्ट राहणारे चॉकलेट हे थोतांड आहे, कारण ते चॉकलेट मूळ डेअरी मिल्क चॉकलेटच्या चवीचे नसते.
चॉकलेट कोठून येते?
आयव्हरी कोस्ट हे आफ्रिकी राष्ट्र जगातील एकूण ३० टक्के कोको बिन्स तयार करते. तसेच त्याच्या शेजारी राष्ट्रांपैकी घाना, कॅमेरून, टोगो आदी पश्चिमी आफ्रिकी गरीब आणि यादवीने माखलेल्या राष्ट्रांमुळे आपल्याला चॉकलेट मिळते. अनेक बडय़ा कंपन्या येथे बालकामगारांची पिळवणूक करून आपल्या उत्पादन आणि फायद्याची समीकरणे जुळवत आहेत. आयव्हरी कोस्टमधील यादवीमुळे तेथील उत्पादनात चढउतार होते तेव्हा जगातील चॉकलेट किमतीत वाढ आणि पुरवठय़ात घट होते. सध्या इबोला या जीवघातक रोगामुळे आयव्हरी कोस्टच्या शेजारील राष्ट्रे अडचणीत आली आहेत. त्यामुळे आयव्हरी कोस्टच्या उत्पादनाबाबत जगभरात भीती निर्माण झाली आहे. या रोगाने जर या देशात पाऊल ठेवले, तर जगभरातील चॉकलेटभक्तांची दैना होऊ शकते.

चॉकलेट स्नान
इ.स. १८००च्या मध्यावधीपासून चॉकलेटचा वापर सौंदर्यप्रसाधनात केला जातो. पाश्चात्त्य देशात टबमध्ये बसून चॉक लेट स्नानही केले जाते. काही स्पामध्ये त्याचा वापर त्वचा सुधारण्यासाठी करतात. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. चॉकलेट स्नानामुळे सेरोटोनिन वाढून उत्साह वाढतो असाही दावा केला जातो. त्वचेची आद्र्रताही त्यामुळे वाढते. काकोच्या स्क्रबमुळे मृत त्वचापेशी काढल्या जातात. त्यामुळे त्वचा उजळते. चॉकलेट हे अँटी ऑक्सिडंट असल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात, असे सौंदर्यतज्ज्ञ झाझा मुरालू यांचे मत आहे.

त्रिमिती चॉकलेट
आता चार्लस् हल यांनी तयार केलेले त्रिमिती प्रिंटिंगचे तंत्रज्ञान स्वस्त झाले आहे. त्यामुळे चॉकलेटचा बंगलाही बांधता येतो, तो तुम्ही मुलांना भेट म्हणून देऊ शकता. यात प्रिंटरमध्ये चॉकलेटचे मिश्रण भरून मेंदीच्या कोनासारख्या यंत्राने बांधणी केली जाते. त्यामुळे मुलांची ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ ही कल्पना त्रिमिती तंत्रज्ञानाने प्रत्यक्षात आणली आहे. तुमच्या चेहऱ्याचा छाप तयार करून देणारी चोको एज कंपनीही आहे. त्यामुळे तुम्ही वाढदिवशी त्या व्यक्तीला चक्क तिचा मुखवटा चॉकलेटच्या रूपात भेट देऊ शकता. यात तुम्ही त्या व्यक्तीचा फोटो कंपनीला दिला तर तशा चेहऱ्यासारखाच मुखवटा करून मिळतो. पण तुम्ही हा त्रिमिती िपट्रर विकत घेऊन घरच्या घरीही चॉकलेटचा बंगला, त्रिमिती चॉकेलट असे विविध प्रकार करू शकता. फक्त चॉकलेटचे मिश्रण तुमच्याकडे पाहिजे.

चॉकलेट केव्हा ‘टेस्टी’ नव्हते
चॉकलेट्स वितळू नयेत यासाठी पूर्वीच्या काळी त्यात भरावासाठी ओट्सचे पीठ मिसळले जात असे व कोको बटरऐवजी इतर मेदपदार्थ मिसळले जात असत, त्यामुळे त्यांची चव फार चांगली नव्हती. चॉकलेटमध्ये ग्लिसरॉल मिसळून त्यातील साखरेचे स्फटिकीकरणही केले जाते त्यामुळे ती घट्ट राहतात.

चॉकलेटचे प्रकार
*  डार्क चॉकलेट – हे कमी गोड असते व त्यात  कोको बिन्स, कोको बटर, साखर व लेसिथिन हे इमल्सिफायर असते.
*  मिल्क चॉकलेट- हे चॉकलेट गोड असते, त्यात १० टक्के कोको दारू, १२ टक्के दूध पावडर असते.
* व्हाईट चॉकलेट- यात कोको बटर, साखर, दूध पावडर, लेसिथिन, व्हॅनिला असते. कोको बटर २० टक्के, दूध पावडर १४ टक्के तर साखर ५५ टक्के असते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Thats इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Detail about chocolate