भारताच्या पूर्वेला बंगालच्या उपसागरात असलेल्या अंदमान बेटांच्या समूहाशी पोर्ट ब्लेअर ह्या राजधानीशी आपण परिचित असतो ते तेथील ‘सेल्युलर जेल’मुळे! स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांच्यासारख्या अनेक शूर बंदिवानांनी येथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. स्वातंत्र्यपूर्व काळात दूरवर असलेल्या ह्या भागात बोटीने जाणे हेच एक दिव्य समजले जात असे. कैद्यांसाठी,राजकीय बंदिवानांसाठी हा प्रवास तेव्हा अत्यंत त्रासाचा होता. स्वातंत्र्यानंतर देशापासून लांब असलेला तुरळक वस्तीचा हा ओसाड प्रदेश ७१ सालच्या भारत-पाक युद्धानंतर निर्वासित लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारकडून उपयोगात आणला गेला. निर्वासितांना कसण्यासाठी जमिनी देऊन तेथे गावे वसविली गेली. हा बेटांचा भूभाग गेल्या काही वर्षांत पर्यटनासाठी विकसित केला गेला. चेन्नई, कोलकाता येथून बोटीने, विमानाने तसेच मुंबईहून विमानाने तेथे जाता येते.
समुद्राच्या गहिऱ्या निळाईत पखरण केलेले जणू हिरवेकंच पाचू म्हणजे अंदमान निकोबारची बेटे. वर्षांतील बराच काळ पडणारा मुबलक पाऊस, भरपूर सूर्यप्रकाशामुळे उंचच उंच दाट वाढणारी झाडे, त्यामुळे सदाहरित जंगलांचा हा प्रदेश, चहूकडे समुद्राचे सान्निध्य असल्याने नारळ, सुपारी, रबराच्या, लवंग, दालचिनी, जायफळ, मिरी आदी मसाल्याच्या लागवडीसाठी पोषक ठरल्याने समृद्ध झाला आहे. सेल्युलर तुरुंगासारखे ऐतिहासिक महत्त्वाचे ठिकाण, विविध बेटे, प्रवाळ, आणि दुर्मिळ जलचर, शंख िशपले आदी खजिन्याची, निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण असलेले समुद्र किनारे, मत्स्यालय, वस्तू संग्रहालय, चाथम येथील आशिया खंडातील मोठी २ं६ ्रे’’ अशी अनेक ठिकाणे आवर्जून पाहण्यासारखी.
 निसर्गाचे एक अनोखे रूप ‘लाईमस्टोन केव्ह’ म्हणजेच चुनखडी उर्फ क्षार गुंफांच्या स्वरुपात अंदमान बेटांच्या समूहात पाहायला मिळते. अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअरपासून सुमारे १०५ किलोमीटर दूरवर ‘बारा टांग’ बेटावर मोठ्या प्रमाणावर चुनखडीचे साठे आहेत. काही चुनखडी जमिनीवर थरांच्या स्वरुपात आढळते, तर काहींच्या क्षार गुंफा निर्माण झाल्या आहेत. समुद्रातील विविध जलचर, कोरल्स यांच्या कवच व सांगाडय़ातील कॅल्शियम काबरेनेट कॅल्साइट समुद्रतळाशी मोठ्या प्रमाणावर साचत जाते. ह्या कॅल्साइटपासून चुनखडीचे खडक तयार होतात. लाखो वर्षांपूर्वी भूगर्भातील हालचालींमुळे हे तळाशी असलेले चुनखडीचे साठे समुद्राच्या पृष्ठभागावर येऊन समुद्रकिनाऱ्यावर टेकडीसारख्या स्वरुपात विसावलेले आहेत. अशा टेकडय़ांवर पावसाचे पाणी पडू लागले, की या पाण्यात हवेतील कार्बनडाय ऑक्साइड विरघळून सौम्य काबरेनिक आम्ल तयार होते, ज्यात चुनखडीचा दगड विरघळतो आणि यातून तयार होतात क्षार गुंफा; म्हणजेच लाइम स्टोन केव्ह्स! अंदमान बेटांच्या समूहातील बाराटांग हे बेट त्यापकी एक ठिकाण.
इथे लाइम स्टोनचे लहान-मोठे सुमारे ३०० साठे असून त्यापकी एक गुहा पर्यटकांसाठी खुली ठेवण्यात आली आहे. पोर्टब्लेअरहून बाराटांग येथे जाण्यासाठी बस तसेच खासगी वाहने उपलब्ध आहेत. पोर्टब्लेअर ते जिरक टांग व जिरक टांग ते बारा टांग असा दोन टप्प्यातील हा प्रवास खाडी ओलांडून जारवा संरक्षित दाट जंगलातून करावा लागतो . निलांबर जेट्टीहून स्पीड बोटीने लाइम स्टोन केव्हस येथे सुमारे पाऊण तासात जाता येते. तिवरांच्या किनाऱ्यांच्या दोन्ही बाजूला सदाहरित दाट जंगल आहे. त्यामधून जाणारी बार टांग खाडी आणि पाणी कापत जाणारी स्पीड बोट हा प्रवास शेवटच्या टप्प्यांत खाडी आक्रसत गेल्याने चिंचोळ्या पट्ट्यातून होतो. या वेळी वरती तिवरांचा मंडप असल्याने अनोखा भासतो.
जेट्टीवर उतरल्यावर तिवरांच्या कांदळ वनातून एक लाकडी पूल पार करून आपण सदाहरित जंगलात पोचतो .वन खात्याने ह्या पुलावर देखील तिवरांची कमान उभारली असून तिवरांची माहिती, त्यांचे पर्यावरणातील महत्त्व सांगणारे फलक लावले आहेत . भरदुपारी देखील जमिनीवर फारसा सूर्यप्रकाश पोचू न देणारे उंचच उंच वृक्ष असलेली दाट जंगलामधून जाणारी सावलीची ही निसर्गवाट संपते आणि समोर पावसाळ्यातल्या कोकणासारखी भातशेतीची हिरवी खाचरे दिसू लागतात. त्यांच्याकडेला वेळी- अवेळी सतत झिमझिमणाऱ्या पावसाने वाटेत गाठलेच तर आसरा घेण्यासाठी इको हट सज्ज आहेत . दीड किलोमीटरचा हा निसर्गरम्य रस्ता लाईम स्टोन केव्ह्सच्या दाराशी घेऊन जातो. काळोख्या विस्तीर्ण गुहेमध्ये कडेच्या िभती ,छतावरून जमिनीकडे जणू झेप घेणारे चुनखडीचे निमुळते सुळके (२३ं’ूं३्र३ी२ ) ,जमिनीवरील गोलाकार घुमटासारखे २३ं’ंॠ्रे३ी२ ,पांढुरक्या रंगामुळे चमकत असतात.
 छताला लटकणारी ही झुंबरे, त्यांचे विविध आकार, ठिबकणारे पाणी, सुळक्यांचे विविध प्रकार निसर्गाच्या ह्या अनोख्या दालनाला गूढ रम्य करतात . जमिनीकडे झेप घेणारे हे निमुळते सुळके आणि जमिनीतून वर आलेले गोलाकार घुमटयांची पुढे कालांतराने गाठभेट होते आणि यातून उभारला जातो नक्षीदार स्तंभ. गुहेच्या विस्तीर्ण दालनात लेण्यांमधे असतात तसे मुद्दाम कोरल्यासारखे हे स्तंभ म्हणजे निसर्गाची सुंदर कलाकृती.
जगात मोजक्या ठिकाणी आढळून येणाऱ्या लाईम स्टोन केव्हज् त्यामधील सुळक्यांच्या विविध आकारामुळे, त्यांच्या चमकत्या पांढुरक्या रंगामुळे आणि त्यांच्या उत्पत्तीबाबत अवगत झालेल्या शास्त्रीय सत्यामुळे मानवी मनास कायम भुरळ घालतात. समुद्र, खंड ,खंडांची उलथापालथ ,त्यांचे सरकणे, बेटांची निर्मिती यांच्या लाखो वर्षांपूर्वीच्या स्थितीवर इतिहासावर प्रकाश टाकतात.अंदमानच्या वन खात्याने पर्यावरणाची हानी न करता उत्तमरीत्या जतन केलेले हे ठिकाण काहीसे लांब असले तरी आवर्जून भेट द्यावी असेच आहे.