उत्तर महाराष्ट्रातील जळगावचा परिसर म्हणजे पूर्वीच्या खानदेशाचाच एक भाग होय. १९६० साली हा भूभाग ‘जळगाव जिल्हा’ म्हणून घोषित करण्यात आला. जळगाव जिल्हा पूर्वीपासून तिथल्या केळीबद्दल, सोन्याच्या बाजारपेठेबद्दल, तर अलीकडे तेथे भंवरलाल जैन उद्योग समूहाने अत्यंत कल्पकतेने उभारलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी केंद्राबद्दल प्रसिद्धीस पावला आहे. अशा या जळगाव जिल्ह्य़ात प्राचीन वैभवसंपन्न राजघराण्यांचा वारसा सांगणारे काही गडकोट आहेत व ते आवर्जून पाहाण्यासारखे आहेत, यावर कोणाचाही चटकन् विश्वास बसणार नाही. अशा या गडकिल्ल्यांच्या दृष्टीने फारशा ऐकिवात नसलेल्या जळगाव जिल्ह्य़ात महाराष्ट्र – मध्यप्रदेश सीमारेषेवर चौगावचा किल्ला उभा आहे. प्राचीन काळापासून दक्षिणेतून मध्यप्रदेशात (नेमाडात) जाणाऱ्या भिराम घाट या डोंगरी भागावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेल्या चौगावच्या किल्ल्याचे महत्त्व अनन्यसाधारण असेच होते. त्याचबरोबर, उत्तर-मध्य प्रांतातून दक्षिणेतील सुरत, भडोच बंदरातून भारताबाहेर निर्यात होणाऱ्या मालासाठी बाजारपेठ म्हणूनही चौगावचे महत्त्व होते. असा हा प्राचीन काळाशी धागेदोरे जोडणारा चौगावचा किल्ला समुद्रसपाटीपासून ६६० मीटर उंचीवर उभा असून तो चौगाव गावापासून उत्तरेला असणाऱ्या सातपुडा डोंगररांगेत विराजमान झाला आहे.
चौगाव किल्ल्यास भेट देण्यासाठी आपणास प्रथम जळगावला पोहोचावे लागते. जळगावहून चोपडा मार्गे किल्ल्याजवळच्या चौगावला आपण पोहोचायचे. जे दुर्गप्रेमी पारोळ्याचा भुईकोट पाहून इकडे येऊ इच्छितात ते पाटोळा-अंमळनेर-लासूर मार्ग चौगाव गाठू शकतात. लासूर पासून चौगाव फक्त ३ कि. मी. अंतरावर आहे. चौगावातून साधारण ४ कि. मी. ची पायपीट केल्यानंतर आपण गडाशेजारच्या महादेव मंदिराजवळ येऊन पोहोचतो. गाव पार केल्यानंतर एका तलावाच्या काठाकाठाने या मंदिरापर्यंत येणारा मार्ग अगदी धोपट असल्यामुळे आपण कोठेही न चुकता सहजपणे मंदिरापर्यंत येऊन पोहोचतो. या ठिकाणी तीन ओढय़ांच्या प्रवाहांचा संगम झाल्यामुळे यास ‘त्रिवेणी संगम’ म्हणून ओळखले जाते. येथे काही वर्षांपूर्वी बांधलेले सुंदर असे प्रशस्त महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराभोवतीच्या जंगलात भरपूर सरपण व ओढय़ाला नेहमी थंडगार पाणी असल्यामुळे हे मंदिर दुर्गभटक्यांना पथाऱ्या पसरायला योग्य आहे. त्रिवेणी संगमावरील या मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग व नंदी सभोवार असणारे खांब व त्यावर तोललेल्या कमानी जुन्या मंदिर परंपरेला साजेल अशाच आहेत. या मंदिराच्या सभोवार अनेक दगड – विटांचे चौथरे असून इतिहासकाळात या जागेस ‘बडा बाजार’ नावाने ओळखले जात असे.
आपण मंदिर परिसर पाहून शेजारील ओढा पार करून मळलेल्या पायवाटेने थोडे पुढे गेल्यावर आपण एका पठारावर येऊन पोहोचतो. येथे समोरच आपणास खुरटय़ा झाडी – झुडूपाने व्यापलेला चौकोनी आकाराचा चौगावचा किल्ला दिसतो. या किल्ल्याच्या आसपास अनेक छोटे – मोठे डोंगर असून त्यांना काली टेकडी, लेभागा डोंगर, बांदरा डोंगर व धाकला चिपाटय़ा डोंगर म्हणून ओळखले जाते. येथील पठारावरून दक्षिण बाजूच्या नाळेने जाणारा मार्ग आपणास गडासमीप घेऊन जातो. चौगावचा किल्ला जरी उंचीने थोडका असला तरी याचा अंतिम कातळटप्पा सभोवार २० फुटांचा ताशीव असाच आहे. त्रिवेणी संगम मंदिरापासून चालायला सुरुवात केल्यानंतर साधारण तासाभरात आपण गडाच्या पूर्वाभिमुख प्रवेशद्वाराच्या सामोरे येऊन पोहोचतो. सुबक घडीव अशा आयताकृती दगडात बांधलेले हे प्रवेशद्वार आजही उत्तम स्थितीत उभे असून त्याच्या माथ्याची कमान फारच सुंदर आहे.
या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर चौगाव किल्ल्याचा झाडीभरला माथा आपणास दिसतो. गडप्रवेश केल्याकेल्या समोरच एक कोरडा तलाव असून तो पार करून आपण पुढे गेल्यावर डाव्या हातास ‘झेंडा बुरूज’ लागतो. या बुरूजा भोवतीची तटबंदी आजही उत्तम स्थितीत उभी असून येथेच आसपास भिंती शाबूत असलेली शिबंदीची घरटी आपणास दिसतात. ही घरटी पाहून पुढे गेल्यावर एका झाडाखाली कोरीव सुघड दगड एकत्र करून रचलेले दुर्गा देवीचे मंदिर पाहायला मिळते. या छोटय़ा मंदिरात देवीचा मूळ तांदळा व अलीकडे बसविलेल्या दुर्गेच्या दोन मूर्ती असून मंदिर परिसरात अनेक इतस्तत: पडलेले कोरीव दगड आपणास दिसतात. या दगडावरून येथील इतिहासकाळातील मंदिर काही और असणार याची आपणास थोडीफार कल्पना येते. या मंदिराच्या पुढेच थोडे खालच्या बाजूस झाडीभरल्या भागात कातळकोरीव टाक्यांचा समूह असून या टाक्यातील पाणी गडचढाईचा थकवा घालविणारे आहे. या टाकीसमूहाच्या मधोमध कातळभिंती असून त्यावरून आपण इकडे-तिकडे वावरू शकतो. या टाक्याला लागूनच चार कमानीयुक्त गुहालेणी आहेत. पण त्याही टाक्यातील पाण्याने भरून गेल्या असल्यामुळे ही लेणी बाहेरून डोकावूनच आपणास पाहावी लागतात. चौगाव किल्ल्यावरील टाक्यांच्या आसपास मोठ-मोठे वृक्ष असल्यामुळे त्यांच्या शीतल सावलीत आपण थंडगार पाण्याच्या सोबतीने घरून आणलेल्या शिदोरीचा आस्वाद घेऊ शकतो.
गडावरील हा टाकीसमूह पाहून आपण एक चढ चढून उत्तरेकडील उंचवटय़ावर बांधलेल्या राजप्रसादाच्या इमारतीजवळ पोहोचायचे. येथील वाडय़ास या भागातील लोक ‘गवळी राजांचा राजप्रासाद’ म्हणून ओळखतात. चौगाव किल्ल्यावरील या वाडय़ाच्या सभोवती असलेल्या २०-२५ फूट उंचीच्या दगड व चुन्याच्या मदतीने बांधलेल्या भिंती आजही उत्तम स्थितीत उभ्या आहेत. विशेष करून या भिंतीच्या माथ्यावर दोन टप्प्यात केलेले विटांचे नक्षीकाम फारच सुंदर असून असे काम इतरत्र कोणत्याही किल्ल्यावर पाहायला मिळत नाही. त्यामुळे चौगाव किल्ल्यावरील हे राजप्रासादाचे विटांचे नक्षीकाम आपल्यासाठी संस्मरणीय ठरते. पूर्व बाजूने प्रवेशद्वार असलेल्या या वाडय़ाच्या आत गेल्यावर समोरच एक भिंत असून तिला वळसा मारून आत प्रवेश केल्यावर या वाडय़ाची भव्यता आपल्या नजरेत भरते. या वाडय़ाच्या आत सध्या मात्र सागवानाच्या झाडांची गर्दी झाल्यामुळे त्यांचा पालापाचोळा तुडवत आत आपणास फिरावे लागते. या वाडय़ाच्या आतील बाजूस अनेक दालने, देवळ्या व कोनाडे आजही आपले अस्तित्व टिकवून असून हा सर्व परिसर पाहिल्यानंतर गड नांदता असताना या राजप्रासादाचा डामडौल किती न्यारा असेल याचे चित्रच आपल्यासमोर उभे राहते.
या वाडय़ासमोरील मोकळ्या जागेत सहा फूट लांबीच्या चार ऐतिहासिक तोफा १९७७ साली सापडल्या. सध्या त्या चोपडा तहसीलदार कचेरीच्या आवारात ठेवण्यात आल्या आहेत. या राजप्रासादाच्या पलीकडेच आणखीन एक छोटय़ा वाडय़ाचे अवशेष आहेत. याशिवाय गडाच्या या उत्तरेस थोडं खालच्या बाजूस गडाचे दुसरे प्रवेशद्वार असून त्याचा सर्व परिसर मात्र झाडीने झाकोळून गेला आहे. चौगाव किल्ल्याच्या पूर्व बाजूचा भूभाग मात्र कोणतेही ऐतिहासिक बांधकाम विरहित असून आपण थोडक्या वेळात या भागाची सहज चक्कर मारून गडाची दोन तासाभराची गडफेरी पूर्ण करून आल्यावाटेने दक्षिण दरवाज्यातून गड उतरायचा.
चौगाव किल्ल्याच्या इतिहासावर नजर टाकल्यास या किल्ल्यावरील कातळकोरीव टाकी व त्यांच्या शेजारील लेणीसदृश गुहा पाहता या किल्ल्याची उभारणी प्राचीन काळात झाली असणार याची आपणास खात्री पटते. या किल्ल्यावरील राजप्रासादांना गवळीराजांचा प्रासाद म्हणून ओळखले जाते. जळगाव परिसरातील किल्ल्यांवर साधारणपणे राष्ट्रकूट यादव व त्यांचे मांडलिक निकुंभ यांची सत्ता होती. यावरून हाही गड याच राजसत्तेच्या ताब्यात असणार असे आपणास अनुमान काढता येते.
असा हा चौगावचा किल्ला जळगाव जिल्ह्य़ातील आवर्जून पाहावा अशा किल्ल्यांपैकी एक असून दुर्गप्रेमीना थोडा लांबचा प्रवास करायला लागला तरी हरकत नाही, इतका हा किल्ला सुंदर आहे. तसेच जळगाव जिल्हा म्हणजे थोडा शुष्क, दुष्काळदृश, कमी झाडी असणारा भूभाग म्हणून ओळखला जात असला तरी चौगावचा किल्ला मात्र बऱ्यापैकी हिरवीगार झाडी – झुडूपे व बाराही महिने शिगोशिग थंडगार पाण्याने भरलेली टाकी आपल्या अंगाखांद्यावर बाळगून आहे.त्यामुळे याला भेट देणाऱ्या दुर्गप्रेमींना तो ‘वाळवंटातील ओअ‍ॅसिस’ प्रमाणे भासला नाही तरच नवल.
    ल्ल  भगवान चिले

Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
chhattisgarh s Elephant Family, Settles in Maharashtra, female elephant, give birth to calf, gadchiroli district , gadchiroli elephant born, elephant news, gadchiroli news, marathi news, animal news,
VIDEO: छत्तीसगडच्या मादीने महाराष्ट्रात दिला पिल्लाला जन्म, ‘प्ररप्रांतीय’ हत्तींचा कुटुंबकबिला विस्तारला…
dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
father and son drown in dhom dam in wai
सातारा: धोम धरणाच्या पाण्यात बुडून पिता पुत्राचा मृत्यू