‘माउंट एव्हरेस्ट’ केवळ गिर्यारोहकांनाच नाही तर सामान्य माणसालाही भुरळ घातलेलं जगातलं सर्वोच्च शिखर! पुण्याच्या गिरिप्रेमी संस्थेनं २०१२ साली या कळसाध्यायावर तिरंगा आणि भगवा फडकवला. इतरांसारखाच त्या वेळी मीही अतिशय रोमांचीत झालो होतो. पुढे २०१३ च्या ल्होत्से-एव्हरेस्ट मोहिमेच्या निमित्ताने माझा आणि मोहिमेचे नेते उमेश झिरपे यांचा परिचय झाला. उमेशने मला या मोहिमेवेळीच ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ ट्रेक आयोजित केल्याचं सांगितलं. मी या मोहिमेत सहभागी झालो आणि कधीही गिर्यारोहण न केलेल्या माझ्यासारख्याच्या आयुष्यात एक मोठे परिवर्तन झाले.
‘माउंट एव्हरेस्ट’ केवळ गिर्यारोहकांनाच नाही तर सामान्य माणसालाही भुरळ घातलेलं जगातलं सर्वोच्च शिखर! पुण्याच्या गिरिप्रेमी संस्थेनं २०१२ साली या कळसाध्यायावर तिरंगा आणि भगवा फडकवला. इतरांसारखाच त्या वेळी मीही अतिशय रोमांचीत झालो होतो. पुढे २०१३ च्या ल्होत्से-एव्हरेस्ट मोहिमेच्या निमित्ताने माझा आणि मोहिमेचे नेते उमेश झिरपे यांचा परिचय झाला. उमेशने मला या मोहिमेवेळीच ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ ट्रेक आयोजित केल्याचं सांगितलं. मी या मोहिमेत सहभागी झालो आणि कधीही गिर्यारोहण न केलेल्या माझ्यासारख्याच्या आयुष्यात एक मोठे परिवर्तन झाले.  गिर्यारोहणाचे आजवरचे माझे नाते तसे केवळ ‘दुरून डोंगर साजरे’ या वर्गातील. हिमालय तर सोडाच पण साधी सह्य़ाद्रीतही मी कुठे भटकंती केली नव्हती. पण या मंडळींचे हे जग, त्यांची दैनंदिनी, आव्हानांना तोंड देण्याची त्यांची चिकाटी, धाडस-साहसाचे वेड आणि या साऱ्याला पुन्हा अभ्यासाची, काहीतरी नवे शोधण्याची वृत्ती याने मी भारावून गेलो. वयाची पन्नाशी ओलांडली होती. तरी असे वाटले, या टप्प्यावरही ही खडतर वाट चोखाळून स्वत:च्याच क्षमतांचा शोध घ्यायला काय हरकत? यातच ‘गिरिप्रेमी’ सारखी संस्थेची साथ आणि उमेशचे प्रोत्साहन मिळाल्याने मनाने उचल खाल्ली आणि मी ‘एव्हरेस्ट तळ मोहिमे’ची वाट पकडली.  ही मोहीम होती एव्हरेस्टच्या कुशीतील. ज्याच्या नावातच ‘एव्हरेस्ट’ आहे, त्याची वाटही तशीच खडतर असणार होती. यासाठी शारीरिक आणि मनासिक अशा दोन्ही पातळीवर तयारी, सराव सुरू झाला. राहत्या इमारतीत जिने खालीवर करणे, मग जवळची टेकडी आणि त्यानंतर मोठे डोंगर, अवघड गडांच्या वाटांवरचे पदभ्रमण सुरू झाले. सामान घेऊन जाणे, दमश्वास वाढवणे, सर्व स्नायूंना सक्रिय करणारे व्यायाम करणे, प्राणायम आणि ध्यानधारणा अशी दैनंदिनी वर्षां-सहा महिन्यासाठी बनली. जिथे आजवर कुठलाच ट्रेक केला नाही तिथे हे सारेच नवे होते.
सराव झाला, शरीर आणि मनाच्या पातळीवर खंबीरता आली आणि या आत्मविश्वासाच्या जोरावरच बरोबर ९ जूनला आम्ही काठमांडूला पोहोचलो. ‘पिक प्रमोशन’ ही आमची जबाबदारी घेणारी संस्था होती. इथे पोहोचल्यावर त्यांनी आम्हाला या मोहिमेसाठीच्या आवश्यक सूचना दिल्या. मग आवश्यक सामानाची खरेदी झाली आणि आमचा ट्रेक सुरू झाला. ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’चा ट्रेक लुक्ला या ठिकाणापासून सुरू होतो. यातील आमचा पहिला मुक्काम होता, फाकडिंग गावात. ही सारी गावे म्हणजे अशाच दुर्गम जागी राहणाऱ्या वस्त्या. या मोहिमेवरचे पहिले पाऊल टाकले आणि एवढय़ा तयारीच्या पाश्र्वभूमीवरही पुढील आव्हानाची जाणीव झाली. खडतर वाट, थकवणारी वाटचाल आणि उंचीवरचे विरळ होत जाणारे वातावरण यांचा सामना सुरू झाला.
वातावरण थकवणारे होते पण निसर्ग भुलवणारा होता. साऱ्या वाटेभोवती सुंदर हिरवळ, पक्ष्यांचं सुखावून जाणारं कूजन, खळाळत वाहणारी दूधकोसी नदी आणि त्यावरचे बांधेलेले लोखंडी पूल! दूरवर थामसेरकू, आयलंड, मेरा, प्युमोरी, आमा दब्लाम अशी हिमालयातली अनेक शिखरं साद घालत होती. हे सारे पाहता -पाहता पायांचा थकवा विसरायला होत होते. आम्ही फाकिडगला पोहोचलो. मुक्कामाचं पहिलं ठिकाण गाठल्याचा आनंद काही औरच होता. फाकिडग येथे पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी
सुरू केलेली शाळा आहे. एव्हरेस्ट मोहिमेदरम्यानच त्यांची इथल्या शेर्पा समाजाशी नाळ जोडली. पुढे त्यांनी या शेर्पासाठी अनेक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणारे प्रकल्प या भागात सुरू केले.  हे शेर्पा लोक अत्यंत विनम्र, कष्टाळू, अगत्यशीर. गिर्यारोहकांचा तर ते जणू श्वासच. त्यांच्या मदतीवर इथल्या मोहिमा चालतात. त्यांची शारीरिक क्षमता एव्हरेस्ट इतकीच बुलंद. वाटेवर शिडय़ा लावणे, सामान वाहून नेणे आणि मुख्य म्हणजे गिर्यारोहकांना व्यवस्थित मार्गदर्शन करत सुरक्षितपणे ने-आण करण्याची कामगिरी ते पार पाडतात. ट्रेकचा दुसरा दिवस. आजचा मुक्काम होता नामचे बाजार! हे ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ ट्रेकच्या मार्गातील बाजाराचं ठिकाण. एव्हरेस्ट आणि अन्य शिखरांच्या मोहिमेसाठी आवश्यक असणारी सर्व साधनं इथे उपलब्ध असतात. नामचे बाजार पर्यंतचा चढ शारीरिक क्षमतेचा कस बघणारा होता. दिवसभराच्या वाटचालीमुळे थकवा जाणवत होता. उद्या जवळच असलेल्या ‘एव्हरेस्ट व्ह्य़ू हॉटेल’पर्यंत वातावरणाशी मिळतंजुळतं होण्यासाठीची (अॅक्लमटायझेशन) चढाई करायची होती. नावाप्रमाणेच इथून जगातल्या सर्वोच्च शिखराचं म्हणजेच ‘माउंट एव्हरेस्ट’चं दर्शन होतं.  नामचे बाजार नंतर आता आमचा प्रवास तेंगबोचे माग्रे फेरीचे गावाच्या दिशेने सुरू झाला. फेरीचे इथे ‘हाय अल्टीटय़ूड सिकनेस’ म्हणजेच अतिउंचीवरील हवामानाशी संबंधित आजारांबाबत मार्गदर्शन करणारी एक संस्था आहे. या संस्थेतून आम्हाला अनेक उपयुक्त सूचना मिळाल्या. या ट्रेकमध्ये अतिउंचीवरील हवामानामुळे शरीराला होणारा त्रास हा अनेकदा महागात पडू शकतो. प्रत्येक मुक्कामागणिक आपण जास्त उंचीवर जात असल्याने प्राणवायूची कमतरता जाणवायला लागते. याची परिणती डोके दुखणे, चक्कर, उलटय़ा होणे आदी आजारांमध्ये होते. याचा त्रास वाढल्यास हे आजार जीवघेणेही ठरू शकतात. म्हणूनच ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ ट्रेकच्या आधी उत्तम शारीरिक तयारी आवश्यक ठरते.  नामचे बाजार नंतर लोबूचे आणि त्यानंतर गोरखशेप या एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या अगदी जवळच्या गावात आम्ही पोहोचलो. गोरखशेप येथे गिरिप्रेमीने २०१२ च्या एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान छत्रपती शिवाजीमहाराजांचा सिंहासनारूढ पुतळा बसवलेला आहे. एवढय़ा उंच ठिकाणी महाराजांच्या या केवळ दर्शनानेच आम्हाला कमालीचे स्फुरण आले. रोमारोमात चेतनेचा आणि अभिमानाचा संचार झाला आणि आम्ही नव्या उमेदीने पुढे निघालो.गोरखशेप जवळ कालापत्थर नावाचा पर्वत आहे. गोरखशेपहून याची उंची आहे १००० फूट. पहाटेच्या वेळी या शिखरावर पोहोचलो तर सूर्योदयाच्या त्या सोनेरी रंगात न्हालेले ‘एव्हरेस्ट’चे दर्शन घडते. दुसऱ्या दिवशी आम्ही या दर्शनासाठी हा पर्वत चढलो आणि या विस्मरणीय क्षणांचे साक्षी झालो.  या दर्शनाने आम्हा साऱ्यांनाच आता त्या अखेरच्या टप्प्याचे म्हणजेच एव्हरेस्ट पायथ्यावरील पावलाचे वेध लागले. शरीराने सगळे थकले असले तरी मनाचा उत्साह सगळीकडे वाढला होता. या उत्साहावर आम्ही नव्या दमाने पुढे निघालो आणि पुढच्याच दिवशी त्या सागरमाथ्याच्या पायाशी नतमस्तक झालो. ट्रेकच्या वाटेवरचा एका पावलाचाही अनुभव नसताना कमावलेले हे यश होते. ज्यातून मी माझा स्वत:लाच नव्याने सापडलो.  आपल्या प्रत्येकातच धाडस, चिकाटी, जिद्द अशा अनेक क्षमता असतात. परंतु या क्षमता-शक्तीची आपल्यालाच जाणीव, माहिती नसते. त्या जागवाव्या, जिवंत कराव्या लागतात. गिर्यारोहणाच्या या वाटेवर मला माझ्यातील याच क्षमतांची नव्याने ओळख झाली. नवा छंद, नवे जग, नवी वाट मिळाली. जगण्यातील मजा कळली, जीवनाचा नवा अर्थ समजला.

ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
Vidit Gujarathi defeated Hikaru Nakamura in the Chess Candidates competition sport news
विदितचा नाकामुराला धक्का; गुकेशचा प्रज्ञानंदवर विजय; हम्पीची सलग दुसरी बरोबरी
RBI bank
रिझर्व्ह बँकेकडून का सुरू आहे सोने खरेदी? गव्हर्नर दास यांनी दिली ही कारणे…