महाराष्ट्र म्हणजे गड-किल्ल्यांची भूमी! या वीरभूमीची शान असलेल्या सह्याद्रीच्या रांगेत असंख्य किल्ले उभे राहिले. सातवाहन काळापासून शिवकाळापर्यंत असंख्य किल्ल्यांनी महाराष्ट्राचा इतिहास प्रेरणादायी केला. हा ऐतिहासिक ठेवा जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. मात्र आज या साऱ्या ठेव्याला घाण, कचऱ्याचा वेढा पडला आहे. गडांवरचे हे अराजक दूर करण्याचा निश्चय ‘गडवाट.. प्रवास सह्याद्रीचा’ या संस्थेने केला आणि २४ नोव्हेंबर या एकाच दिवशी सह्य़ाद्रीतील अनेक किल्ल्यांवर ही साफसफाई करत विधायक दुर्गभ्रमंतीचा नवा अध्याय जोडला.
‘फेसबुक’च्या माध्यमातून या शिवकार्यासाठी ‘फेसबुक’ माध्यमातून आवाहन करण्यात आले होते. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक युवकांनी या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. यातून या सर्व संदस्यांचे गट पाडले आण त्यांना एकेक किल्ला वाटून देण्यात आला. या प्रत्येक गटात पाच ते वीस सदस्य होते. या गटांनी पुण्याजवळील मल्हारगड, नाशिकमधील किल्ले अंजनेरी, साताऱ्यातील कास तलाव आणि परिसर आणि मुंबई विभागातील कलावंती शिखर, किल्ले प्रबळगड, किल्ले चंदेरी, किल्ले पेब, किल्ले इरशाळ गड आदी दुर्गावर स्वच्छता मोहीम राबवली.
प्रत्येक किल्ल्यावर चार ते पाच तास झालेल्या या साफ-सफाईत प्लास्टिकच्या पिशव्या, पाकिटे, बाटल्या गोळा करण्यात आल्या. प्रत्येक किल्ल्यावर अशी सहा ते सात पोती कचरा जमा करण्यात आला. या कचऱ्यात मद्याच्या बाटल्यांचे प्रमाण मोठे होते. हा कचरा गोळा करण्यात युवक पुढाकार घेत असताना तो करण्यातही गडावर जाणारे तरुणच आघाडीवर असल्याची खंत या संस्थेचा सदस्य राहुल बुलबुले, राहुल साठे यांनी व्यक्त केली. ‘गडवाट.. प्रवास सह्याद्रीचा’ संस्थेच्या या उपक्रमात स्थानिक लोकांनीही सहभाग घेतला.
एकीकडे राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभागाने गड-किल्ल्यांचे जतन करण्यास आम्ही असमर्थ असल्याची कबुली न्यायालयात दिली असतानाच, शिवप्रेमाने भारावलेल्या तरुणाईच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.