15 December 2017

News Flash

खान्देशातील डोंगरयात्रा

भटकंतीचा सोबती डोंगरदऱ्या भटकायला बाहेर पडले, की नाशिकची भूमी सर्वाधिक खुणावते. गाळणा, सेलबारी, डोलबारी, चणकापूर,

अभिजित बेल्हेकर abhijit.belhekar@expressindia.com | Updated: December 26, 2012 1:03 AM

भटकंतीचा सोबती
डोंगरदऱ्या भटकायला बाहेर पडले, की नाशिकची भूमी सर्वाधिक खुणावते. गाळणा, सेलबारी, डोलबारी, चणकापूर, दुंधेश्वर, त्र्यंबक, नाशिक, पेठ, सातमाळ, पट्टा अशा अनेक पर्वतरांगांचे पदर इथे एकामागे एक उलगडत जातात. पुन्हा या प्रत्येक रांगेवर गूढ आकार घेतलेले एकेक दुर्गशिखर दडलेले असते. नाशिकच्या या आसमंतात एकदा अडकले, की भटकणारे पाय या भूमीकडे सतत खेचत राहतात. अशाच भटक्यांसाठी, नाशिक प्रदेशातील या गिरिदुर्गवाटांची माहिती घेऊन नुकतेच एक इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध झाले आहे – Nashik Expanse – 101 trekking destinations!
नाशिकचे गिर्यारोहक आणि प्रसिद्ध छायाचित्रकार संजय अमृतकर यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे इंग्रजी भाषेतील खान्देशची डोंगरयात्रा आहे. नाशिकसाठीचा ‘ट्रेकिंग इनसायक्लोपीडिया’ असलेल्या या पुस्तकाच्या आकार, मांडणी, माहिती आणि छायाचित्रांपर्यंत साऱ्यांत वैविध्य आणि आकर्षकता आहे.
तब्बल सव्वादोनशे पानांच्या या पुस्तकात नाशिकमधील १०१ गिरिस्थळांची माहिती दिली आहे. या स्थळांची रचना करतानाही या भागातील एकेक डोंगररांगेप्रमाणे त्यांचे गट केलेले आहेत. पुन्हा या गटामध्येही मग एकेका स्थळाची प्रवासातील क्रमानुसार आखणी केलेली. या गटाच्या सुरुवातीलाच त्या डोंगररांगेची माहिती, विस्तार, नकाशा आणि एक पॅनरॅमिक छायाचित्र या साऱ्यांतून हा प्रदेशच आपल्यापुढे उभा राहतो. यानंतर आपण फक्त या रांगेवरील एखादे गिरिशिखर निवडायचे आणि चालू पडायचे. या अशा एखाद्या ट्रेकवर निघालो, की मग हे पुस्तक त्या त्या स्थळाची माहिती देताना तो भाग, त्याचा नकाशा, नाशिकहून जाण्याचा मार्ग, प्रवासाची साधने, जवळचे गाव, तिथून त्या गिरिशिखरावर चढाईचा मार्ग, उंची, वाटेतील खाणाखुणा, प्रेक्षणीय जागा, इतिहास-भूगोल, भवतालातील आकर्षणे अशी सारी माहिती देते. ही सारी माहिती मोजक्याच शब्दांमध्ये आहे. यासाठीही भाषेचा फुलोरा असण्यापेक्षा उपयुक्ततेला प्राधान्य दिलेले आहे. या माहितीच्या जोडीलाच राहण्याची जागा, जेवणाची सोय, पेट्रोलपंप-गॅरेजच्या जवळच्या जागा, वैद्यकीय सुविधा या साऱ्या गरजेच्या आणि महत्त्वाच्या गोष्टींची नोंद या प्रत्येक प्रकरणात घेतलेली आहे.
उत्तम, केवळ सुंदर अशी छायाचित्रे तर या पुस्तकाचा आत्माच म्हणावा लागेल. खरेतर हे पुस्तक अशा सौंदर्य छायाचित्रांचा खजिनाच आहे. केवळ या छायाचित्रांच्या प्रेमात पडून पाठीवर सॅक टाकत एखाद्या डोंगरयात्रेवर निघावेसे वाटते.. एका पाठीमागे उलगडत जाणाऱ्या त्या डोंगररांगा, विविध ऋतू-प्रहरांमध्ये न्हालेली ती गिरिशिखरे, त्या पर्वतांचे गूढ-रम्य आकार, भोवतीचे ऐतिहासिक अवशेष, जैवविविधता, रस्ते, खेडी-माणसे, नद्या-नाले, जंगल आणि आकाश या साऱ्या विषयांना अमृतकर यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातून वेगवेगळय़ा रंगांचे तरल भाव बहाल केले आहेत. नाशिकच्या या भूगोलाला सुंदर केले आहे!
माहिती, उपयुक्त संदर्भ, नकाशे आणि उत्तम छायाचित्रांच्या या संग्रहातून नाशिकचा हा ‘ट्रेकिंग इनसायक्लोपीडिया’ चांगलाच सजला आहे.
(पुस्तकासाठी संपर्क- ९४२०००२२११)

First Published on December 26, 2012 1:03 am

Web Title: hill travel in khandesh
टॅग Hill Travel,Khandesh