नाशिक धार्मिकदृष्टय़ा महत्त्वाचे ठिकाण. त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी, वणी, पंचवटी, रामाची देवळे असे अधिष्ठान लाभलेल्या भाविकजनांचे श्रद्धास्थान असलेल्या नाशिकला आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे गिर्यारोहकांची पंढरी म्हणून! महाराष्ट्रातील साडेतीनशे किल्ल्यांपैकी सुमारे ३० किल्ले नाशिक जिल्हय़ात आहेत. येथील किल्लेही उंच, दमछाक करणारे, गिर्यारोहकांचा कस पाहणारे, नवशिक्यांची छाती दडपणारे. इथले ब्रह्मगिरी, धोडप, मार्किंडा, साल्हेर, मुल्हेर, सलोटा, मोरागड, हरगड, रावळय़ा, जावळय़ा, हरिहर, रामसेज, अहिवंत असे अनेक किल्ले ट्रेकर्सना खुणावत असतात, तर नवरा-नवरी, हदबीची शेंडी यांसारखे सुळके, अलंग, कुलंग, मदन, अंकाई, टंकाई सर करण्यासाठी गिर्यारोहकाचे सतत प्रयत्न सुरू असतात. यातीलच ही साल्हेर-मुल्हेरची मोहीम!
ठाण्याहून रात्रभर प्रवास करून आम्ही सकाळी नाशिक जिल्हय़ातल्या सटाणा तालुक्यातील बागलाण येथे पोचलो. महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवरील हा प्रदेश ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचा, संपन्न, सुपीक आहे. येथल्या लोकांची भाषा, पोशाख, जेवण म्हणजे गुजराती आणि मराठीची मस्त सरमिसळ. साल्हेरवाडीपासून मजल, दरमजल करत दमछाक करणारा चढ चढत साल्हेर व सालोटाच्या मधल्या खिंडीत येईपर्यंत उन्हाचे चटके जाणवू लागले. झाडे अजिबात नसल्याने उन्हं ऐन थंडीतदेखील भाजून काढणारी वाटत होती. निसरडी असलेली अरुंद वाट घशाला कोरड पाडत होती. पण शेवटच्या टप्प्यातील दगडी पायऱ्या चढून वरती गेल्यावर सारा शीण दूर झाला. डावीकडे किल्ल्याच्या पोटात खोदलेली पाण्याची टाकी, गुहा, तर उजवीकडे खाली दिसत होती लांबवर पसरलेली हिरव्या शेतांची चौकटी. या गडाच्या माथ्यावर एक लांबलचक कपार! ऊन, पावसापासून संरक्षण देणारी ही कपार रणरणत्या उन्हात सुखावत होती. कपार संपल्यावर परत थोडा चढ चढून मुक्कामाच्या गुहेपाशी आलो. पोटपूजा झाल्यानंतर गप्पागोष्टी करत बसल्यावर ऐन दुपारी चक्क थंडी जाणवू लागली व लक्षात आले, की महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्यावर आम्ही पावते झालो आहोत.
संध्याकाळी अरुंद, निसरडय़ा वाटेने गुहेच्या मागच्या टेकडीवरील परशुरामाचे मंदिर पाहण्यास गेलो. हे मंदिर सुमारे ५००० फूट उंचावर असल्याने आजूबाजूचा विस्तृत प्रदेश न्याहाळता येत होता. किल्ल्यावरील गंगासागर तलावाचे पाणी निळसर रंगाचे दिसत असल्याने रमणीय भासत होते. आजूबाजूच्या डोंगररांगांमधून सलोटा, मोरागड, मुल्हेर, हरगड डोळय़ांचे पारणे फेडत होते. साऱ्या रमणीय आसमंतात निसर्गसौंदर्याची विलक्षण अनुभूती मन थक्क करत होती. सूर्यबिंब गुलाबी, लाल अशा रंगछटा दाखवू लागले. दूरवर पक्ष्यांच्या माळा दिसत होत्या. सूर्यनारायणाला घाई झाली होती निरोप घ्यायची. त्याची शेवटची लालबुंद कड क्षितिजावर विसावली आणि एकाएकी गार वारे सुटले.
सूर्यास्तापाठी आम्हाला घाई झाली ती मुक्कामाच्या उबदार गुहेत पोचण्याची. निसरडय़ा वाटेवरून उतरून गुहेत पोचलो व थोडय़ाच वेळात आजूबाजूच्या डोंगररांगा काळोखात बुडाल्या, उत्तरोत्तर काळोख अधिकच दाट होऊ लागला. दूरवर मांगी व तुंगी येथील उंच डोंगरावरील जैन मंदिरांचे दिवे लुकलुकताना दिसत होते. थोडय़ाच वेळात आकाशाच्या गोल घुमटावर चांदण्यांचा नक्षीदार पट उलगडला होता. थंडीचा कडाका आपली चुणूक दाखवू लागला. त्यात भर पडली जोरदार वाहणाऱ्या बोचऱ्या वाऱ्याची. रात्र वैऱ्याची नव्हे तर वाऱ्याची होती. आमच्या शेकोटीची पार दैना करून तो आमच्या भोवती घोंगावत होता. जेवण झाल्यानंतर बर्फतुल्य पाण्याने स्वत:ची ताट, वाटी घासताना तर सारेच थंडीने कुडकुडू लागले.
सारे आवरून सर्वजण पुन्हा शेकोटीभोवती बसलो. गडावरची नीरव शांतता, आकाशातील चांदणे आणि आमच्या पुढय़ातील धगधगणारी शेकोटी यात आमची रात्र सुरू झाली. शेकोटीच्या फडफडणाऱ्या ज्वाला इतिहासात घेऊन जाऊ लागल्या. या किल्ल्याचा इतिहास म्हणजे स्वराज्यासाठी प्राण वेचलेल्या शूर वीरांचा इतिहास. इसवी सन १६७२मध्ये हा किल्ला शिवाजीमहाराजांनी जिंकला व मोगलांचा मोठा हल्ला परतवून लावला. त्या वेळी झालेले युद्ध हे फार मोठे व स्वराज्यातील शूर वीरांच्या शिरपेचातील पराक्रमाची गाथा सांगणारे मानबिंदू होय. सरनौबत प्रतापराव, मोरोपंत पेशवे, व्यंकोजी पंत, आनंदराव, सूर्यराव काकडे आदी शूर वीरांनी जिंकलेले हे युद्ध दिल्ली बादशाहाच्या जिव्हारी लागले होते. हा इतिहास ऐकता ऐकताच आम्ही सारेजण त्या काळोखात गुडूप झालो. थंडीने गारठलेल्या रात्रीला आता वेध लागले होते उष:कालाचे. आदल्या दिवशी संध्याकाळी ज्या टेकडीवरून मावळत्या सूर्यनारायणाला निरोप दिला त्याच टेकडीवरून त्याचे स्वागत करण्यासाठी आम्ही पहाटेच्या काळोखात ती टेकडी चढून परशुरामाच्या मंदिरात आलो. अंधाराचे आवरण फेडत तो सहस्ररश्मी कधी येतोय असे सर्वाना झाले होते. हळूहळू पूर्वेकडचे आकाश गुलाबी रंगात उजळू लागले. तो लालबुंद गोलाकार तुकडा क्षितिजावर हळूच डोकावू लागला. वर सरकू लागला. क्षणार्धात आकाशात वर झेपावणारा तो तेजोनिधी लोह गोल पाहून सारे हरखले.
न्याहारी झाल्यावर सामानाची बांधाबांध करून आम्ही वाघांबे गावात उतरणाऱ्या रस्त्याकडे कूच केली. येथे दगडात कोरलेल्या उंच पायऱ्या आहेत. पाठीवरची सॅक सांभाळत तोल सावरत त्या उतराव्या लागतात. खालच्या वाघांबे गावातून बसने मुल्हेर गडाच्या दिशेने निघालो. मुल्हेर गावातून किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर धनगरवाडीकडे जाणाऱ्या वाटेने गड चढू लागलो. चढ अगदी सोपा. वाटेत व गडावर भरपूर वृक्षसंपदा. उघडय़ा बोडक्या साल्हेरवरची उन्हं झेलल्यानंतर मुल्हेर गडावरची दाट झाडी व गारवा अगदी आल्हाददायक भासतो. विहिरी, वाडे, घरे, मंदिरे यांचे अवशेष, विस्तीर्ण मोती तलाव, मंदिर, आंबा, वड, आदी वृक्ष; गड एकेकाळी संपन्न होता याची खात्री पटविणारे. बालेकिल्ल्यावर पाण्याची टाकी, राजवाडय़ाचे अवशेष व भडंग नाथाचे मंदिर आहे. या गडाचा पहिला ऐतिहासिक उल्लेख इसवी सन १३३० मधला आढळतो. यापासून ते इसवी सन १६९२ पर्यंत असलेले राजे, किल्लेदार, राजवटी यांची माहिती देणारा फलक बागलाण प्रतिष्ठानने सोमेश्वर मंदिरात लावला आहे.
हा किल्ला बागुल राजांनी बांधला. बागुल राजवटीमुळे या परिसराला बागुल गड व त्याचा अपभ्रंश बागलाण असे नाव पडल्याचे म्हटले जाते. मुल्हेर गडावर जायला वाटा सोप्या, मळलेल्या व सावलीच्या. वरती मुक्कामाला सोमेश्वर आणि गणेश अशी दोन मंदिरे आणि बालेकिल्ल्यावरील गुहा, पाण्याच्या टाक्या आणि गडावर भरपूर झाड झाडोरा. त्यामुळे हा गड वर्षांच्या कोणत्याही ऋतूमध्ये नवशिक्यांनादेखील पाहता येतो. पहाटे लवकर उठून बालेकिल्ला पाहून परतीची वाट धरली. गड उतरून मुल्हेर गावात आलो.
गावात गुजराती पांढरी गोडसर कढी, तिखट ठेचा, नाशिकची मेथीची भाजी असे गुजराती व मराठी सरमिसळ असलेले रुचकर जेवण जेवून परतीच्या प्रवासाला लागलो.  बागलाण प्रदेशातील साल्हेर, मुल्हेर पाहिल्यावर पुन्हा यायचे ते नाशिकमधल्या किल्ल्यावरच, असा संकल्प करून आम्ही परतलो.

Wardha Police, mahatma Gandhi s proverbial monkey idea, Combat Rising Cybercrime, marathi news, cyber police, cyber crime news, wardha news, wardha police news,
महात्मा गांधी यांची प्रतीके अन् वर्धा पोलिसांची नाविन्यपूर्ण…
sainani baba , Buldhana Sailani Baba Mahayatra at Raipur Sailani in Taluka
सैलानी बाबा ‘लालपरी’ला पावले! ९७ लाख ५३ हजारांचा उत्पन्नरूपी प्रसाद
nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण