गोवा म्हटले, की अथांग समुद्रकिनारे आणि त्याच्या आश्रयाने नटलेले समुद्री पर्यटन डोळय़ांपुढे येते. पण या समुद्री पर्यटनाशिवायही इथे भटकंतीजोगी अनंत स्थळे दडलेली आहेत. या अशाच अपरिचित गोवा आणि त्याच संस्कृतीतील दीव, दमणला दुर्गअभ्यासक सदाशिव टेटविलकर यांनी पुस्तकबद्ध केले आहे- ‘दुर्गलेणी- दीव, दमण, गोवा’!
टेटविलकरांचा मूळ पिंड दुर्गभटक्या जमातीचा! हे गडकोट पाहता पाहताच ते महाराष्ट्राची हद्द ओलांडत गोव्यात शिरले आणि तिथेच रमले. अनेक वर्षांच्या या गोमंतक भूमीच्या प्रवास-अभ्यासातूनच त्यांचे हे पुस्तक आकारास आले आहे.
खरेतर गोवा ही सौंदर्यभूमी! पण याच भूमीवर सातवाहन, चालुक्य, शिलाहार, कदंबापासून ते अगदी शेवटी पोर्तुगीजांपर्यंत अनेक शासक नांदून गेले. या प्रत्येकाने इथे आपली संस्कृती रुजवली, वाढवली. गोव्यातील या स्थळांमध्ये याच साऱ्या संस्कृतीचे बंध सापडतात. टेटविलकरांनी गोवा, दीव, दमण प्रांतातील याच मिश्र संस्कृतीचे त्यांच्या पुस्तकातून दर्शन घडवले आहे.
दुर्ग, लेणी, मंदिरे, चर्च, संग्रहालये, राजवाडे, वीरगळ, शिलालेख, ताम्रपट अशा या प्रत्येक थांब्यातून हा प्रदेश उलगडत जातो. त्यातील इतिहास, भूगोल, प्राचीन संस्कृती, रूढी-परंपरा, स्थापत्य असे अनेक पदर प्रगट होत जातात.
महाराष्ट्राप्रमाणेच हादेखील किल्ल्यांचा प्रदेश! फक्त इथल्या किल्ल्यांची रचना निराळी, स्थापत्य आगळे! तेरेखोल, अलोर्ण, शापोरा, अग्वाद, रईस मॅगोज, वास्को किंवा दमणमधील सेंट जेरोम, दीव बेटावरील पाणकोट या किल्ल्यांची प्रकरणे वाचताना या वैशिष्टय़ांचेच दर्शन घडते. हरवळेची लेणी किंवा कदंबाची राजधानी चांदोर आपल्याला प्राचीन गोव्यात बुडवून टाकते. प्राचीन कलात्मक मंदिरे आणि चर्च तर गोव्याचे भूषण! तांबडी सुर्ला, शांतादुर्गा, मंगेशी, म्हाळसादेवी, नागेश्वर या एकेका मंदिराची माहिती, इतिहास, वैशिष्टय़े या पुस्तकातून कळतात. रईस मॅगो, सेंट कॅथ्रेडल, बॉम जीजस् सारखी प्रसिद्ध चर्च इथे भेटतात. गोवा संग्रहालय, पुराणवस्तू संग्रहालयांसारखी म्युझियम्स त्यांच्यात दडलेल्या वास्तू आणि वस्तूंची कुतूहल सांगतात. छत्रपती शिवाजीमहाराजांनी जीर्णोद्धार केलेले सप्तकोटेश्वर मंदिरही याच पुस्तकात भेटते आणि संभाजीमहाराजांचा फोंडा-डिचोलीतील पराक्रमही इथे समजतो.
गोवा आणि दीव-दमण या दोन्ही प्रदेशांवर पोर्तुगीजांची सत्ता होती. यामुळे या दोन्हीत संस्कृतीचा एक समान धागा. यातूनच टेटविलकरांनी याच पुस्तकात एक भाग या दीव-दमणवर लिहिला आहे. दीव-दमण हा खरेतर पूर्णपणे अपरिचित भाग! एरवीही कधी साधे चर्चेत नसलेल्या या प्रांतातील पर्यटन तर दूरची गोष्ट आहे. पण टेटविलकरांच्या याच पुस्तकातून दमणचा इतिहास, सेंट जेरोम किल्ला, ऐतिहासिक डॉमनिक चर्च, दीपस्तंभ, दीवचा पाणकोट, भुईकोट, सेंट पॉल चर्च, दीवचे संग्रहालय, जामा मशीद या स्थळांची माहिती मिळते. एका वेगळय़ाच प्रदेशाची, त्यातील अपरिचित स्थळांची ओळख होते. भटकंतीच्या वेडाला नव्या वाटा सापडतात. महाराष्ट्राच्या सीमा ओलांडत अन्य प्रदेशांतील आडवाटांवर स्वार व्हावेसे वाटते. टेटविलकरांच्या या पुस्तकाचे यश यातच आहे.
(‘दुर्गलेणी- दीव, दमण, गोवा’ – सदाशिव टेटविलकर, संपर्क- ९७६९४२८३०६)