03 March 2021

News Flash

भटिंडय़ाचा गोविंदगड

भारताच्या मालवा प्रांतातील भटिंडा या शहराचा शोध कसा लागला याविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. ‘हिस्ट्री ऑफ पतियाळा’ चे लेखक खलिफा मोहम्मद हसन यांच्या मतानुसार या शहराचे

| May 1, 2013 01:20 am

भारताच्या मालवा प्रांतातील भटिंडा या शहराचा शोध कसा लागला याविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. ‘हिस्ट्री ऑफ पतियाळा’ चे लेखक खलिफा मोहम्मद हसन यांच्या मतानुसार या शहराचे इतिहासकालीन नाव ‘बिक्रमगढ’ असे होते. सहाव्या शतकात भटी राजपूत या राजाने हे शहर वसविले आणि त्याचे नाव ‘बथिंडा’ ठेवले. त्यानंतर या राजघराण्याच्या आडनावाने म्हणजेच ‘व्हटिंडा’ किंवा ‘ बिटुंडा’ या नावाने हे शहर ओळखले जाऊ लागले. कालांतराने या नावातही बदल होऊन अखेर या शहराची ओळख भटिंडा अशी झाली.
कोणेएके काळी हे शहर तलावांचे शहर (सिटी ऑफ लेक्स) या नावाने प्रसिद्ध होते. तसेच ‘गेट वे टू राजस्थान’ म्हणूनही इतिहासात शहराची ओळख आहे. किला मुबारक, बाहिया किल्ला, लाखी जंगल, रोझ गार्डन, झुऑलॉजिकल गार्डन, चेतक पार्क, मझार ऑफ पीर हाजी रतन, गुरुनानक देव थर्मल पॉवर प्लान्ट, नॅशनल फर्टिलायझर प्लॉन्ट अशी वेगवेगळी पर्यटकांसाठी आकर्षणाची स्थळे भटिंडात दिमाखाने उभी असली तरी खऱ्या अर्थाने इतिहासाची साक्ष देणारा, अनेक लढाया, स्वाऱ्या अनुभवलेला ‘भटिंडा फोर्ट’ शहराच्या मध्यवर्ती भागात असून, पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. हा किल्ला ‘गोविंदगढ’ या नावानेही प्रसिद्ध आहे.
शतकानुशतके अनेक लढाया, स्वाऱ्यांचा अनुभव घेऊन इतिहासाच्या पाऊलखुणा जपलेले हे अप्रतिम दिमाखदार वास्तुशिल्प राजा भटी राजपुताने इसवी सन ६व्या शतकात वसविले. भटी राजानंतर हिंदू शाही सम्राट जयपाल याने शहरावर राज्य केले. जयपाल राजाचे सुलतान सबुक्तीगीन आणि त्यानंतर त्याचा मुलगा गझनीचा मेहमूद यांच्याबरोबर युद्ध झाले. मेहमूदने या युद्धादरम्यान किल्ल्याला वेढा घातला. कालांतराने गझनीचा मेहमूद आणि राजा पृथ्वीराज चौहान यांच्यातही युद्ध झाले आणि अवघ्या १३ दिवसातच पृथ्वीराज चौहानने हा किल्ला ताब्यात घेतला.
महम्मद घोरीच्या निधनानंतर दिल्लीच्या तख्तावर इल्तुतमिसाह याने आपली कन्या रझिया सुलतान हिला तख्तावर बसविले. भारताची पहिली महाराणी म्हणून ती दिल्लीच्या तख्तावर विराजमान झाली. परंतु रझियाचा तत्कालीन बालमित्र मलिक अल्तुनिया याला ते पटले नाही. त्याने बंडखोरांशी हातमिळवणी केली आणि रझियाच्या साम्राज्याला धक्का दिला. एप्रिल १२४० मध्ये त्याने रझिया सुलतानला भटिंडा किल्ल्यात कैद करून ठेवले. रझिया सुलतान कैदेत असली तरी प्रार्थनेसाठी तिच्याकरता किल्ल्यातून पालखी, मेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दिल्लीची जनता मात्र तिच्या पाठिशी होते. तिने त्यांच्या मदतीने आणि स्वत:च्या बुद्धिचातुर्याने अशी काही व्यूहरचना आखली की तिच्याविरुद्ध बंड पुकारणाऱ्या बंडखोरांची आपापसातच भांडणे होऊ लागली. लष्करी आघाडीवर तिने या बंडखोरांचा म्होरक्या वझीर मुहम्मद जुनैदीला पराभूत केले. पराभवानंतर त्याने सक्रिय राजकारणातून माघार घेतली आणि काही दिवसातच रझियाने किल्ल्यातून स्वत:ची सुटका करवून घेतली. महाराणी रझिया सुलतानच्या अटकेमुळेही हा किल्ला विशेष चर्चेत राहिला.
किल्ल्याचे बाह्य़रूप आजूबाजूच्या वाळवंटी प्रदेशाशी मिळतेजुळते आहे. पंजाब राज्याच्या, पर्यायाने भारताच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेल्या व्यूहरचनेत या किल्ल्याचे महत्त्व मोठे आहे. महाराजा अलासिंगनेही स्वत:चे राज्य सुरक्षित ठेवण्यासाठी इ.स. १७५४ च्या दरम्यान हा किल्ला पुन्हा ताब्यात घेतला.
वाळवंटी प्रदेशांमध्ये होणाऱ्या वादळांचा मुकाबला करण्यासाठी योग्य राहील अशी या किल्ल्याची उभारणी करण्यात आली आहे. सुमारे १५ एकरावर बांधण्यात आलेल्या या किल्ल्याची उंची १०० फूट आहे. किल्ल्यासाठी वापरलेल्या मातीच्या विटा कनिष्कराजाच्या काळातील आहेत. प्रत्येक बाजूस चार मोठे आणि आठ लहान बुरुज आहेत. प्रत्येक बुरुज १२० फूट रुंदीचा आणि मोठे मनोरे सुमारे ३०० फुटाचे असे भव्यदिव्य आहेत. सध्या पंजाब सरकारकडून त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.
शिखांचे दहावे गुरू गुरु गोविंद सिंग यांनी या किल्ल्याला भेट दिल्याचा इतिहासात उल्लेख आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ किल्ल्यावर दोन गुरुद्वारा बांधण्यात आले आहेत. तेथे नियमितपणे लंगरची (भोजन) सोय करण्यात आली आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या हाताला राणीचा महाल आहे. त्याचे छत फुलांच्या नक्षीकामाने सुशोभित केले आहे.
पंजाब राज्याला भेट दिली असता न चुकवावे अशा काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांमध्ये भटिंडा किल्ल्याचा नक्कीच समावेश करायला हवा. भटिंडा हे शहर आशिया खंडातील मोठय़ा रेल्वे जंक्शनपैकी एक आहे. शहरातून ६ वेगवेगळ्या शहरांना जोडणारे रेल्वेमार्ग आहेत. त्यामुळे भटिंडय़ाला जाऊन गोविंदगडला भेट देणे आणि बरोबर छोले-भटुरे, कुलचा आणि वेगवेगळ्या पराठय़ांचा आनंद घेणे तुम्हाला नक्कीच आवडेल होना़
    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2013 1:20 am

Web Title: the govindgarh fort tourist places bhatinda punjab
Next Stories
1 ट्रेक डायरी: भैरवगड-कोयना जंगल ट्रेक
2 हिवरेची हिरवाई
3 चालुक्यांची कल्याणी
Just Now!
X