गडकोटांची मांदियाळी असलेल्या या महाराष्ट्र देशात सध्या गडकोटांबद्दल बऱ्यापैकी जाणीवजागृती झाली आहे. शिवजयंती, पुण्यतिथी, गिरिभ्रमण, दुर्ग साहित्य संमेलन अशा विविध प्रसंगी तरुणांची पावले गडकोटांकडे वळत आहेत. तर अनेक दुर्गप्रेमी संस्था दुर्गसंवर्धनाची, गडावरील साफसफाईची, वृक्षारोपणाची कामे करीत आहेत. अजूनही काही किल्ले अप्रसिद्ध किंवा अल्प प्रसिद्ध आहेत. यातील काही किल्ले वैशिष्टय़पूर्ण आहेत. गडावरील स्थापत्य, द्वारशिल्पे, गुहा, मंदिरे, पाण्याचे साठे, दुर्गम वाटा, वनसंपदा, ऐतिहासिक घटना अशा बाबतीत एक किंवा अनेक वैशिष्टय़े या अपरिचित गडावर असू शकतात.

कर्नाटकच्या हद्दीत पण महाराष्ट्राला जवळ असा एक अल्पपरिचित किल्ला आहे तो म्हणजे संकेश्वरजवळचा ‘वल्लभगड’. कोल्हापूर-बेळगाव मार्गावर कागलपासून निपाणीमार्गे ३५ कि.मी. वर संकेश्वर आहे. संकेश्वराच्या अलीकडे ‘हरगापूर फाटा’ लागतो, तेथे महामार्ग सोडून वल्लभगड गावाकडे जावे लागते.
गावातूनच गडाच्या पायऱ्यांना सुरवात होते. ही वाट पाऊलवाटेत रूपांतरित होऊन पडक्या तटबंदीच्या आत नेते. पायऱ्या चढू लागल्यापासून अध्र्या तासात आपण गडमाथ्यावर पोचतो. शिवथरघळीची आठवण यावी अशा एका घळीत इथे सिद्धेश्वर मंदिर आहे. घळीतील भुयाराचे दुसरे तोंड संकेश्वर गावात आहे असे स्थानिक लोक म्हणतात. या मंदिरापासून आणखी थोडय़ा पायऱ्या चढून वर गेलो की एक पाऊलवाट येथील ऐतिहासिक विहिरीकडे जाते. ही आकाराने प्रचंड विहीर कातळात खोदलेली आहे. दातेगड व कमळागडावरील विहिरीप्रमाणेच ही विहीर प्रेक्षणीय आहे.
हनुमान मंदिराजवळून एक भुयारी मार्ग या विहिरीत उतरण्यासाठी आहे. गडावर पूर्वी कधी वस्ती होती. आता अर्धवट पडकी अशा काही घरे दिसतात. हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. आम्ही तेथे गेलो तेव्हा मंदिरात काही लोक भजनाची पूर्वतयारी करीत होते. त्यांच्याशी गप्पागोष्टी करून काही माहिती मिळवायचा प्रयत्न केला. या मंदिरामुळे ग्रामस्थांचे गडावर येणे जाणे असते. सध्या ज्ञानेश्वरी पारायण येथे चालू आहे. वल्लभगड गाव कर्नाटकात असले, तरी गावात मराठी भाषकांची संख्या चांगली आहे. गावात मराठा व लिंगायत समाजाचे लोक आहेत. आम्ही महाराष्ट्रातून किल्ला पाहायला आलो याचे या लोकांना कौतुक वाटत होते. भजनी मंडळासाठी आणलेला चहा आग्रहाने त्यांनी आम्हालासुद्धा दिला.
गडाचा माथा विस्तृत नाही. उत्तरेकडे एक टेहेळणी बुरुज आहे. बुरुजाच्या िभतीत पायऱ्या आहेत. बुरुजावरून भवतालाचे विहंगम दृश्य दिसते. दक्षिणेकडे हिरण्यकेशी नदीचे खोरे आहे. नैर्ऋत्य बाजूला सामानगड आहे. खाली तळात हरगापूर व वल्लभगड गावातील घरे दिसतात. तटबंदीच्या बाहेरून गडप्रदक्षिणा करीत असताना मरगुबाई देवीचे नवे मंदिर पाहिले. ही येथील ग्रामदेवता. समोर एक मोठी दीपमाळ आहे. गवावरून हा सगळा परिसर पाहता पाहता वेगळय़ा जगात हरवायला होते.