कुठल्याही गडावर गेले, की पहिला शोध सुरू होतो,तो पाण्याचा. सह्य़ाद्रीतील गडकोटांवरील या सिंचनाचा एका भटक्याने घेतलेला हा आढावा..

किल्ल्यांवरील टाकी, तलाव, विहिरी या व इतर पाणी साठवण्याच्या पद्धती हा माझ्या आवडीचा विषय आहे. किल्ल्यावरील हे पाणी साठे किल्ल्यांबद्दल बरीच माहिती सांगून जातात. किल्ल्यावर किती शिबंदी असावी, किल्ला बांधला त्या वेळेचे पडणाऱ्या पावसाचे प्रमाण, किल्ल्याचे महत्त्व वाढल्यावर पाणी साठवण्यासाठी केले गेलेले नवे उपाय यांचा अंदाजही या पाणी साठय़ांवरून करता येतो. किल्ला लढता ठेवण्यासाठी सनिक अन्नधान्याइतकेच किंवा त्याहून जास्तच पाणी साठय़ाला महत्त्व होते. त्यामुळे हा पाणी साठा वाढवण्याचे, त्या टाक्यात, तलावात जास्तीत जास्त पाणी साठवण्याच्या अनेक युक्त्या आपल्या पूर्वजांनी (त्या काळच्या स्थापतींनी) शोधून काढल्या होत्या.  
या वर्षी भर पावसाळ्यात चाळीसगाव-औरंगाबाद परिसरातील किल्ल्यांवर जाण्याचा योग आला. पावसाळ्यामुळे पेडका किल्ल्यावरील तलाव चांगले भरलेले होते. त्यामुळे किल्ल्यावर राबवण्यात आलेली पाणी स्थिरीकरणाची योजना नीटच पाहता आली. पाणी स्थिरीकरण म्हणजे काय? डोंगरावरून, जमिनीवरून वाहत येणारे पाणी आपल्याबरोबर माती, गाळ, कचरा घेऊन येते. हा गाळ टाकी, तलावात साठत जातो. या गाळावर नव्या पाण्याच्या दाब पडल्यामुळे मातीचा थर सिमेंटसारखा घट्ट होतो. अशाप्रकारे दरवर्षी साठत जाणाऱ्या गाळामुळे अनेक तलाव व धरण भरून जातात किंवा कायमची बाद होतात. पाण्याच्या दाबामुळे घट्ट झालेला हा गाळ काढणे ही मोठी खíचक व वेळकाढू बाब होते. त्यामुळे पाण्याबरोबर येणारा गाळ खाली बसावा, मुख्य टाक्यात, तलावात येऊ नये यासाठी वाहते पाणी थोडा वेळ थांबवून (स्थिर करून) त्यातील गाळ खाली बसवण्यात येतो. यालाच पाण्याचे स्थिरीकरण म्हणतात. महाराष्ट्रातल्या बऱ्याच किल्ल्यांवर पाणी स्थिरीकरणासाठी अशा अनेक योजना राबवलेल्या पाहायला मिळतात.
पेडका किल्ल्यावर पाण्याचा मुख्य तलाव प्रवेशद्वाराच्या वरच्या अंगाला आहे. या तलावाच्या वर डोंगर पसरलेला आहे. या डोंगरावरून वाहत येणारे पाणी थेट मोठय़ा तलावात जाऊन तो गाळाने भरू नये यासाठी या तलावाच्या वर दोन छोटे तलाव बनवलेले आहेत. सर्वात वरच्या पठारावर असलेल्या तलावात पठारावरून वाहणारे पाणी व गाळ जमा होतो. तो तलाव भरला की वरचे पाणी बाजूच्या पन्हाळीतून खालच्या बाजूला असलेल्या बांधीव तलावात येते. इथे पाण्याला पुन्हा एकदा स्थिर करून त्यातील गाळ खाली बसवला जातो. या तलावाच्या बांधाच्या एका कडेला वरच्या बाजूस पाणी जाण्यासाठी पन्हाळी बनवलेली आहे. त्यातून पाणी खालच्या मोठय़ा तलावात जमा होते. यामुळे मोठय़ा तलावात फारच कमी प्रमाणात गाळ जमा होतो. या शिवाय दोन अतिरिक्त पाणी साठे तयार होतात आणि दरवर्षी वरच्या दोन छोटय़ा तलावातील गाळ कमी पशात व मनुष्यबळात उपसता येतो.
मनोहर-मनसंतोषगड हे तळकोकणातले किल्ले, या भागात महामूर पाऊस पडतो. पावसाळ्यात मनोहर गडावरच्या वाडय़ामागून एक ओढा वाहतो. आता गडाची तटबंदी जिथे कोसळलेली आहे तेथून या ओढय़ाचे पाणी खालच्या दरीत पडते. किल्ला बांधताना त्या वेळेच्या स्थापतींनी या ओढय़ातील पाण्याचा वेग कमी करण्यासाठी व पाणी साठवून त्याचा निचरा करण्यासाठी तटबंदीजवळ एक तलाव बांधला होता. तसेच तटबंदीत जागोजागी पाणी जाण्यासाठी मोऱ्या बांधल्या होत्या. आजही नीट पाहिले तर गाळात गाडल्या गेलेल्या तलावाचे अवशेष व ढासळलेल्या तटबंदीत पाणी जाण्यासाठी बांधलेल्या मोऱ्या पाहायला मिळतात. ओढय़ाचे पाणी आपल्याबरोबर भरपूर गाळ घेऊन येत असे. ते पाणी तलावात आणून त्याचा वेग कमी केले जाई व पाणी स्थिर केल्यामुळे त्यातील गाळही खाली बसत असे. तलावाच्या बांधावरून बाहेर पडणारे पाणी तटबंदीतील मोऱ्यांवाटे दरीत जात असे. अशा प्रकारच्या योजनेमुळे ओढय़ाच्या पाण्याचा अतिरिक्त दाब पडून तटबंदीला धोका होत नसे व गडावरील वापरासाठी अतिरिक्त पाणीसाठा पण तयार होई.
ठाणे जिल्ह्यातील बोईसरजवळ असावा किल्ला आहे. या किल्ल्यावर एक प्रचंड मोठं पाण्याचं टाकं आहे. या टाक्याच्या तीन बाजू कातळात कोरलेल्या असून एक बाजू दगडांनी बांधलेली आहे. डोंगरावरचे पाणी कातळ उतरावरून टाक्यात पडते. त्या पाण्याबरोबर येणारा गाळ टाक्यात जाऊ नये म्हणून येथे कातळात जागोजागी रुंद व खोल खळगे कोरलेले आहेत. त्यात वाहत्या पाण्यातला गाळ साठून रहात असे व शुद्ध पाणी तलावात जात असे. तसेच या खळग्यात साठणारा गाळ काढणे पण सोपे होते.याशिवाय बऱ्याच किल्ल्यांवर पाणी स्थिरीकरणासाठी उतारावर एकाखाली एक पाण्याची टाकी कोरलेली पाहायला मिळतात. या रचनेमुळे डोंगर उतारावरून येणार गाळमिश्रित पाणी सर्वात वरच्या टाक्यात पडत असे. ते टाकं भरल्यावर पाणी पुढच्या टाक्यात जात असे. अशाप्रकारे सर्वात वरच्या टाक्यातच जास्तीत जास्त गाळ साठत असे. त्यामुळे गाळ कमी पशात व मनुष्यबळात उपसता येत असे.
किल्ला पाहिल्यावर अनेक जणांची तक्रार असते, की किल्ल्यावर पाहाण्यासारखं काही नव्हतं. पण प्रत्येक किल्ल्याचं स्वत:च असं एक वैशिष्टय़ असतं, तो ते आपल्याला दाखवत असतो, पण गरज आहे ती त्याच्याकडे शोधक नजरेने पाहण्याची.

Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना