रस्त्यावर दोन गाड्यांचा अपघात आपल्यापैकी काहींनी प्रत्यक्षात पाहिला असेल. अनेकदा आपण अशा अपघाताचे सीसीटीव्ही फूटेज इंटरनेटवर व्हायरल झाल्याचे पाहतो. मात्र अशाप्रकारे आकाशात दोन विमानांची किंवा समुद्रामध्ये दोन जहजांची धडक देण्याचा प्रकार क्वचितच होतो. मात्र मेक्सिकोमध्ये दोन क्रूज जहाजे एकमेकांना धडकली. हा अपघात कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार मॅक्सिकोमधील कोझूमेल बंदराजवळ दोन क्रूझ जहाजे एकमेकांना धडकली. ९५२ फूट लांबीचे ‘कार्निव्हल ग्लोरी’ हे जहाज किनारपट्टीवर येण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी बंदरावर उभ्या असणाऱ्या ‘कार्निव्हल लेजंड’ या जहाजाला ते धडकले. २० सेकंद ही दोन्ही अवाढव्य जहाजे एकमेकांना धडक देत होती. या वेळी बंदरावर उभ्या असणाऱ्या काही लोकांनी या अपघाचे चित्रिकरण केले.

‘द इंडिपेंडट’ने दिलेल्या वृत्तानुसार या अपघातामध्ये क्रूजमधील सहाजण किरकोळ जखमी झाले आहेत. ही दोन्ही जहाजे ‘कार्निव्हल क्रूज’ या कंपनीच्या मालकीची आहेत. “जहाजांचे किती नुकसान झाले आहे याचा तपास आम्ही करत आहोत. पण ही जहाजे लवकरच पुन्हा समुद्रात प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील,” असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट दिल्या आहेत.

एकीकडे नेटकरी यावर मजेदार कमेंट करत असतानाच या अपघाताचे गांभीर्य पाहिल्यास वेळीच या क्रूजच्या खलाशांनी जहाजांवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अपघात टळला असच म्हणता येईल.