रस्त्यातले खड्डे हे जणू आपल्या भारतीयांच्या सवयीचा भाग झाला आहे. पाचवीला पुजलेल्या खड्ड्याची साडेसाती कधीच जाणार नाही हे आता हळूहळू आपल्याला समजू लागलं आहे. सोशल मीडियावर पालिका, सरकार सगळ्यांना दोष देऊन झाले, आंदोलनं केली, खड्ड्यांवर राजकारण घडलं पण खड्ड्यांची समस्या काही सुटली नाही. हे संपूर्ण प्रकरण भांडून किंवा आंदोलन करून सोडवण्यासारखं नाही हे जेव्हा एखाद्या संवेदनशील कलाकाराच्या लक्षात येते, तेव्हा ही समस्या तो जगापुढे कशी मांडतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा फोटो.

Viral Video : बाबागाडीतून मुलांना फिरवताय? मग हे पाहाच

बंगळूरूचा व्हिज्युअल आर्टिस्ट बादल नांजूदासस्वामी याने खड्ड्यांच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा आपल्या हटके स्टाईलनं लोकांच लक्ष वेधून घेतलं आहे. रस्त्यातील खड्ड्यांना त्याने यावेळी असं काही रुप दिलंय की त्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. बंगळुरूमधील रस्त्यांवर एकूण १ लाख ६० हजारांहून अधिक खड्डे असल्याचं समोर आलं आहे. त्यातून परेड ग्राऊंड एमजी रोडवर मोठा खड्डा पडला आहे, त्यात पाणीही साचले आहे. खड्ड्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. आता वारंवार सांगून प्रशासन काही यावर लक्ष देणार नाही म्हणून बादलने या खडड्याला तळ्याचं रुप दिलं आणि त्यात मॉडेल सोनू गोवाडा हिला जलपरी म्हणून बसवलं.

Viral Video : अशी गंमत केली तर या उंच काचेच्या पुलावर कोण बरं जाईल?

प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्याने खड्ड्याचा जो काही कायापालट केलाय त्यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर बादल आणि बंगळूरूमधील खड्डे चर्चेचा विषय ठरलेत. गेल्यावर्षी थायलंडमधल्या टॅक प्रांतातली मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत पाम नावाच्या युवतीने अशाच अनोख्या पद्धतीने खड्ड्यांकडे लक्ष वेधलं होतं. वारंवार सांगूनही प्रशासन ऐकत नाही तेव्हा तिने खड्ड्यात बसून त्यातल्या पाण्याने प्रतिकात्मक निषेध स्नान केलं होतं.