लहान बाळाला भूक लागली की स्तनपानासाठी कोणतीही योग्य वेळ आणि योग्य ठिकाण नसते. मात्र तरीही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी आपल्या चिमुकल्याला स्तनपानासाठी घेऊन बसल्याचे कारण देत महिलांवर टीका केली जाते. नजरेने त्यांना लक्ष केले जाते किंवा थेट सार्वजनिक ठिकाणी असे करु नका अशाचप्रकारची सूचना देण्यात येते. नुकतीच अशीच एक घटना मेक्सिकोत  घडली. हॉटेलमध्ये आपल्या ४ महिन्यांच्या बाळाला घेऊन एक महिला स्तनपानासाठी बसली होती, त्यावेळी तिच्या बाजूने जाणाऱ्या एका व्यक्तीने तिला अंग झाकण्यास सांगितले.

यानंतर या महिलेने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र तिने तिचे स्तन झाकण्याच्या ऐवजी चेहराच झाकला. विशेष म्हणजे तिच्या पतीने ही सर्व घटना कॅमेरात कैद केली आणि काही वेळातच तिचा हा फोटो व्हायरलही झाला. या महिलेचे फॅमिली फ्रेंड असलेल्या कॅरोल लॉकवूड यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर हा फोटो अपलोड केला. या फोटोविषयी लिहिताना ते म्हणतात, ”माझ्या मित्राची सून जेव्हा बाळाला स्तनपानासाठी घेऊन बसली तेव्हा तिला अंग झाकण्यास सांगण्यात आले, तसे तिने केलेही.

हे छायाचित्र शेअर केल्यानंतर त्याला असंख्य लाईक्स आणि शेअर्स मिळाले आहेत. तर अनेकांनी महिलेने दिलेल्या प्रतिक्रियेला पाठिंबा दर्शवला आहे. तर ही महिला खरंच हुशार आहे असे म्हणत अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. याबाबत ती महिला म्हणाली, मी माझ्या कुटुंबासोबत सुटट्यांचा आनंद घेण्यासाठी याठिकाणी गेले होते. मी बाळाला स्तनपानासाठी जेव्हा घेऊन बसते तेव्हा कायम सावध असते. मात्र आम्ही हॉटेलच्या मागच्या बाजूला बसल्याने मी त्यावेळी थोडी आरामात बसले होते.