केंद्र सरकारच्या नावाने देशातील गरीब जनता, शेतकरी आणि गरजू व्यक्तींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. अनेक योजनांचे पैसे थेट लाभार्थींच्या बँक खात्यावर पाठवले जात आहे. मात्र सध्या सोशल नेटवर्किंगवर अशाच एका योजनेची माहिती देणारा मेसेज व्हायरल झालाय. खास करुन व्हॉट्सअपवर या मेसेजची चांगलीच चर्चा आहे. या मेसेजमध्ये केंद्रातील मोदी सरकारने सबका साथ सबका विकास नावाची योजना आणल्याचा दावा कऱण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येकाच्या खात्यावर एक लाख रुपये जमा केले जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र या मेसेजमधील सत्य काय आहे यासंदर्भात सरकारी खात्यानेच खुलासा केला आहे.

थेट केंद्र सरकारच्या पत्रसूचना विभागानेच (पीआयबी) याबद्दल खुलासा केला आहे. व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी पीआयबीने ‘पीआय़बी फॅक्ट चेक’ नावाने एक ट्विटर अकाऊंट सुरु केलं आहे. या अकाऊंटवरुन व्हायरल होणाऱ्या बातम्यांची सत्यता पताळून त्यासंदर्भात थेट सरकारकडूनच स्पष्टीकरण दिलं जातं. याच ट्विटर हॅण्डलवरुन या व्हायरल मेसेजबद्दल खुलासा करण्यात आला आहे. हा मेसेज खोटा असल्याचं पीआयबीने स्पष्ट केलं आहे. हा दावा खोटा असून सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही असं पीआयबीने म्हटलं आहे.

या व्हायरल मेसेजमध्ये देण्यात आलेला फोन नंबर हा ट्रू कॉलर फोन अॅपवरुन तापसला असता नरसिंह रंधारी नावाच्या व्यक्तीचा असल्याचं समजतं. हा क्रमांक ओदिशामधील असल्याचीही माहिती ट्रूकॉलरवर उपलब्ध आहे.

तुम्हाला असा खोटा मेसेज आल्यास…

तुम्हालाही अशाप्रकारचा एखादा सरकारी योजनेचा मेसेज आल्यास पीआयबीच्या फॅक्ट चेक साईटवर म्हणजेच https://factcheck.pib.gov.in/ वर तुम्ही त्याची सत्यता पडताळून पाहू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही व्हॉट्सअपवरुन +91 8799 7112 59 या क्रमांकावर अथवा pibfactcheck@gmail.com या ईमेल आयडी वरुन माहितीची सत्यता पडताळून घेऊ शकता. ही माहिती  https://pib.gov.in वरही उपलब्ध आहे.