लहान मुलांवर नजर ठेवली नाही, तर ते कधी काय करतील सांगता येत नाही. त्यांच्या बाल लीला नेहमीच ज्येष्ठांच्या नाकीनऊ आणतात. पण, त्यांच्याकडे थोडी जरी दुर्लक्ष केलं तर काहीतरी विपरित घडू शकते. याचा प्रत्यय देणारी एक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. खेळत असताना एका मुलाचा दुसऱ्या मजल्यावरून तोल गेला अन् ते इमारती खालून जाणाऱ्या धावत्या रिक्षात पडले. मध्य प्रदेशातील टिकमगढ येथे ही घटना घडली आहे.

या घटनेबद्दल बोलताना आशिष जैन (मुलाचे वडील) म्हणाले, “दुसऱ्या मजल्यावर घरातील कुटुंबातील सदस्यांबरोबर बाळ घरात खेळत होते. दरम्यान, कठड्यावरून अचानक तोल जाऊन बाळ खाली पडले. त्यानंतर इमारतीखालून जाणाऱ्या रिक्षात ते पडले. विशेष म्हणजे बाळाची रुग्णालयात तपासणी केली असून, त्याला कोणतीही इजा झालेली नाही, असं जैन यांनी सांगितलं.

अंगावर शहारा आणणारी ही घटना इमारतीच्या बाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. यात दुसऱ्या मजल्यावरून कोसळलेलं मुल रिक्षात पडताना दिसत आहे. त्यानंतर काही लोक धावत येऊन त्या बाळाला घेऊन रुग्णालयात जाताना दिसत आहे.

घटनेवर नेटकऱ्यांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. चांगलं काम केलं तर परमेश्वरही आनंदी होईल, मुलाचे प्राण वाचल्याबद्दल आनंदी आहे, असं एकानं म्हटलं आहे. तर नशीबवान असलेल्यांपैकी एक असं एकानं म्हटलं आहे.