नायजेरियाच्या एका छोट्याशा गावात अंधश्रद्धेच्या नावाखाली कुटुंबियाने २ वर्षांच्या मुलाला रस्त्यात सोडून दिले होते. या मुलाच्या शरीरात दृष्ट आत्मे आहेत असे मानून त्यांनी या निष्पाप मुलाला मरणासाठी सोडले. एका समाजसेविकेने या छोट्याशा मुलाला वाचावले आणि त्याला जीवनदान दिले. आज तो मुलगा चांगले आयुष्य जगत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जीवन आणि मरण या संघर्षामधील त्याच्या जिद्दीची कथा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

नायजेरियातील गरिब जनतेसाठी काम करणारी डॅनिश समाजसेविका लोवेने यांना एका रस्त्यावर कुपोषित मुलगा सापडला. हा २ वर्षांचा मुलगा भूक आणि उपासमारीने मरणासन्न अवस्थेत होता. या मुलाच्या अंगात दृष्ट आत्मे आहेत या अंद्धश्रद्धेपोटी त्याला कुटुंबियांनी मरणासाठी रस्त्यावर सोडून दिले होते. नायजेरियातील अनेक गावांमध्ये मुलांना अंधश्रद्धेपोटी अशा अवस्थेत सोडले जाते. या मुलाची जगण्याची कोणतीही आशा नव्हती. त्यांच्या शरीरावर झालेल्या जखमेत किडे पडले होते. त्याला गावातील कोणीही पाहायला तयार नव्हते. अशा अवस्थेत लोवेन यांनी या मुलाला आपल्या सोबत नेले. इतर समाजसेवकांच्या मदतीने त्याची जखम साफ करून त्यावर योग्य ते उपाचार केले. याचवर्षी जानेवारी महिन्यात त्यांनी या मुलाला जीवनदान दिले होते. सोशल मीडियासारख्या प्रभावी माध्यमाचा वापर करून त्यांनी या मुलाच्या वैद्यकिय खर्चासाठी मदत करण्याचे आवाहन लोकांना केले. त्यांच्या या आवाहनाला जगभरातील अनेकांनी प्रतिसाद दिला. त्यांच्याकडे कोट्यवधी रक्कमेची मदत जमा झाली आणि याच पैशातून त्यांनी या कृष मुलाला जीवनदान दिले.

जेव्हा लोवेन यांनी या मुलाला पहिल्यांदा पाहिले होते तेव्हाचे काही फोटोही त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केले होते. कुपोषीत बालकाला त्या पाणी भरवत होत्या. अत्यंत हृदयद्रावक या फोटोंनी तिथल्या भयाण परिस्थितीचे दर्शन घडवून आणले. आजही नायजेरियातल्या अनेक गावांत छोट्या मुलांना अंधश्रद्धेपोटी रस्त्यावर मरणासाठी सोडून दिले जाते. उपचार झाल्यानंतर या मुलाचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर टाकले आहे. सध्या हा मुलगा लोवेन आणि तिच्या पतीसोबत त्यांच्या अनाथ आश्रमात राहतो. लोवेन आणि इतर समाजसेवाकांनी जीवनदान दिलेली अशी अनेक मुले या आश्रमात राहतात. त्यांच्या शिक्षण, औषध आणि खाण्यापिण्याची खर्च या आश्रमाला आलेल्या देगण्यातून केला जातो.