सोशल मीडिया हे सध्या कोणतीही गोष्ट विशिष्ट समुदायापर्यंत पोहचविण्याचे उत्तम माध्यम झाले आहे. या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधण्याबरोबरच जागरुकतेचे संदेश देण्याचे कामही अनेक संस्था, संघटनांकडून केले जाते. पोलीसही यामध्ये मागे नाहीत. मुंबई पोलीस सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत विविध प्रकारचे महत्त्वपूर्ण संदेश पोहोचविण्याचे काम कायम करत असल्याचे आपण याआधीही पाहिले आहे. आता दिल्ली पोलिसांनीही अशाप्रकारे सोशल मीडियाचा वापर करण्यामध्ये पुढाकार घेतला असून वाहतुकीचे नियम नागरिकांना समजावण्यासाठी या प्रभावी माध्यमाचा वापर करण्याचे ठरविले आहे. काही गंमतीशीर आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी काही पोस्ट सोशल मीडियावर टाकत दिल्ली पोलिसांनी जागृती करण्याचे ठरवले आहे.

वाहन चालविताना कोणती काळजी घ्यायला हवी, सुरक्षेच्या दृष्टीने कशापद्धतीने वागायला हवे, याबाबतचे कायदे यांविषयी तपशीलाने माहिती यामध्ये देण्यात आली आहे. यामध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हच्या संदर्भातील एक अतिशय आकर्षक असा व्हिडिओही दिल्ली पोलिसांनी तयार करुन तो आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. सिग्नल तोडू नका, चारचाकी चालवताना सिटबेल्टचा वापर करा, असे संदेश देण्यासाठी पोलिसांनी काही GIF तयार केले आहेत. विशेष म्हणजे नागरिकांनी या गोष्टी पोलिसांच्या अकाऊंटवरुन रिट्विटही केल्या आहेत.

मात्र पोलिसांची ही कल्पकता नागरिकांना नक्कीच भावेल आणि वाहतुकीचे नियम पाळण्यामध्ये त्याचा उपयोग होईल अशी आशा आहे. असे झाल्यास अपघातांची संख्या निश्चितच कमी होईल आणि अनेकांचे प्राण वाचू शकतील. सुरक्षेसाठी कोणताही माफी नाही असेही पोलिसांनी आपल्या पोस्टखाली लिहिले आहे. आता त्यांच्या या आवाहनाचा कितपत उपयोग होतो आणि दिल्लीतील नागरिक आता तरी वाहतुकीबाबत जागरुक होतात का हे पाहावे लागेल.