पाळीव कुत्र्याला हायड्रोजन फुग्यांना बांधून हवेत उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीमधील युट्यूबरने हा व्हिडीओ शूट करत युट्यूबला शेअर केला होता. यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली असून अटक करण्यात आली आहे.

आरोपी गौरव जॉन याने आपल्या युट्यूब चॅनेलसाठी एक व्हिडीओ तयार केला होता. यावेळी त्याने आपल्या पाळीव कुत्र्याला एका पार्कमध्ये फुग्यांनी बांधलं होतं. नंतर त्याने फुगे सोडले आणि कुत्र्याला अक्षरश: हवेत उडवलं. यावेळी कुत्रा काही वेळासाठी हवेतच तरंगत होता. यावेळी गौरव आणि त्याची आई उत्साहात नाचत होते. हा व्हिडीओ युट्यूबवर शेअर करण्यात आला होता. प्राणीमित्र संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर व्हिडीओ हटवण्यात आला.

पशू क्रूरता कायद्यांतर्गत गौरव आणि त्याच्या आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडीओ डिलीट केल्यानंतर गौरवने आपल्या युट्यूब चॅनेलवर अजून एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने आपण आधीचा व्हिडीओ का डिलीट केला याचं कारण सांगितलं आहे. तसंच आपण तो व्हिडीओ शूट करताना सर्व काळजी घेतली होती असाही दावा केला आहे. आपल्या व्हिडीओमुळे दुखावलेल्यांची त्याने माफीही मागितली आहे.