सोशल मिडियावर आपण सामान्यांच्या प्रामाणिकपणाच्या अनेक कथा वाचतो. अशीच एक कशा सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. ती म्हणजे साताऱ्यातील माण तालुक्यामधील पिंगळी बुद्रुक गावातील धनाजी जगदाळे यांची. केवळ गावाकडे जाणाऱ्या एसटी बसच्या तिकीटाचे सात रुपये खिशात नसताना चाळीस हजार रुपयांच्या नोटांचा बंडल धनाजी यांना सापडला. मात्र त्यातील एकही रुपया न घेता तो धनाजी यांनी परत केला. या प्रामाणिकपणासाठी धनाजी यांना हजार रुपयांचे बक्षीस देऊ केले असता धनाजींनी केवळ घरी जाण्यासाठी सात रुपये द्या अशी मागणी केली. धनाजी यांच्या गावात राहणाऱ्या राजेंद्र जगदाळे यांनी लिहिलेली धनाजी यांच्या प्रामाणिकपणाची कथा सांगणारी पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. अनेक फेसबुक पेजेसवरुन ही पोस्ट करण्यात आली असून त्याला हजारोंच्या संख्येने लोकांनी शेअर केले आहे.

नक्की काय घडलं

व्यक्तिवेध : मीना चंदावरकर
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…

माण तालुक्यामधील पिंगळी बुद्रुक गावातील ५४ वर्षांचे धनाजी यशवंत जगदाळे याचे हातावरचे पोट. रोज काम केलं तर खायला मिळणारा सर्वसामान्य व्यक्ती. दहिवडी आठवडा बाजार झाल्यावर धनाजी उशिरा दहिवडी स्टँडवर पोहचले. समोर घरी जाण्यासाठी बस लागली होती. परंतु तिकिटासाठी ७ रुपये त्यांच्याकडे नव्हते. गावातील ओळखीची एकही व्यक्ती त्यांना त्या दरम्यान तिथे दिसत नव्हती. एक गाडी सोडली, दुसरी सोडली पण ओळखीची व्यक्ती कोणीच दिसेना. जायचं कसं हा विचार करत दिवसभर कंटाळलेले धनाजी बसल्या जागेवर झोपून गेले. धनाजी यांना जाग आली तेव्हा अंधार पडला होता.

दरम्यान घरी जाण्यासाठी ७ रूपयांसाठी कोणाची तरी वाट पहात असणाऱ्या धनाजी यांच्याजवळ ४० हजार रुपयेचा बंडल पडलेला त्यांना दिसला. ७ रूपये मिळतायत यासाठी वाट बघत असणाऱ्या धनाजी यांना ४० हजार रूपये सापडले. पण ‘चला निघून जावू, आता गाडी भाडयाने करून जाऊ, दिवाळी चांगली साजरी होईल’ असा किंचितही विचार धनाजीच्या मनात आला नाही. धनाजी यांनी आजूबाजूच्या सर्वांना तुमचे पैसे पडलेत का अशी विचारणा सुरू केली. कोणी काहीच बोलत नव्हते. शेवटी त्यांनी शोधाशोध करून एसटी स्टँड पोलीस चौकीजवळ पोलीसांची वाट पहात बसले.

बऱ्याच वेळाने एक गृहस्थ स्टँडवर आले व धनाजी बसलेले त्याच्या आजूबाजूला ते बसलेल्या ठिकाणी आपले पैसे शोधू लागले. त्यावेळी काही प्रवाशांनी आताच एक कमी उंचीचा माणूस कुणाचे पैसे पडलेत का विचारत असल्याची माहिती त्या गृहस्थांना दिली. त्या गृहस्थाने संपूर्ण बस स्टँड पालथे घातले त्यावेळी त्यांना बस स्टँड पोलीस चौकीजवळ धनाजी पोलिसांची वाट पाहत बसलेले दिसून आले. त्यांनी धनाजी यांना आपले पैसे हरवल्याचे सांगितले. ज्याचे आहेत त्यालाच पैसे मिळावेत यासाठी धनाजी यांनी पैसे हरवल्याचे सांगणाऱ्याची चौकशी सुरु केली. किती रक्कम आहे, नोटा कशा होत्या असे प्रश्न धनाजी यांनी त्या व्यक्तीला विचारले. त्या प्रश्नांना उत्तर देताना त्या गृहस्थाने “माझे ४० हजार रूपये हरवले आहेत. पत्नीचे ऑपेरशन आहे त्यासाठी पैसे घेऊन निघालो होतो. गाडी न मिळाल्याने बाकावर बसून होतो तेव्हा खिशातून पडले,” अशी माहिती धनाजी यांना दिली. त्या उत्तराने धनाजी यांची हरवलेले पैसे याच गृहस्थाचे असल्याची खात्री पटली.

धनाजी यांनी ज्या व्यक्तीला मदत केली ती व्यक्ती (फोटो: स्क्रीनशॉर्ट न्यूज १८)

धनाजी यांनी तो ४० हजार रुपयांचा बंडल काढून त्या व्यक्तीच्या हातात देताच आपला हरवलेला पैशांचा बंडल सापडला म्हणून त्या व्यक्तीचे डोळे पाणावले. बायकोचे ऑपरेशन कसे करायचे हा त्यांना पडलेला प्रश्न पैसे परत मिळाल्याने सुटला होता. त्या व्यक्तीने बक्षीस म्हणून त्या बंडलातील एक हजार रूपये काढून धनाजी यांना देऊ केले, पण मनाने धनवान असलेल्या धनाजी यांनी ते बक्षीस घेतले नाही. “मला काहीही बक्षीस नको तुमचे पैसे तुम्हाला मिळाले. आता तुम्ही तुमच्या बायकोचे ऑपरेशन करू शकता यात मला सर्व काही मिळाले,” असं धनाजी यांनी त्या व्यक्तीला सांगितलं. तरीही त्या व्यक्तीने खूप आग्रह केल्यावर धनाजी यांनी “ते १ हजार त्याच बंडलात ठेवा. घरी जाण्यासाठी माझ्याकडे ७ रूपये नाहीत म्हणून मी स्टँडवरच पडून राहिलो. मला फक्त घरी जाण्यासाठी ७ रुपये द्या,” अशी विनंती त्या व्यक्तीकडे केली. धनाजी यांचा प्रामाणिकपणा आणि भाबडेपणा पाहून त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आलं. ज्याला ४० हजार रूपये सापडूनही फक्त ७ रुपये प्रवासासाठी बक्षीस रूपाने हवे आहेत त्याला देवदूतच म्हणावे लागेल ना.

“परिस्थिती अनेकांना वाईट मार्गाने जायला लावते. पण चांगले काम करत परिस्थितीचा सामना करणारे धनाजी यांच्यासारखे धनवान व्यक्ती दिसून येतात. या कार्यामुळे धनाजी जगदाळेंचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. अनेक लोक पैसा संपत्तीने श्रीमंत असतात पण मनाची श्रीमंती असणारा गरीब धनाजी माझ्याच शेजारी बसून ही वस्तुस्तिथी सांगताना माझ्याही डोळ्यात अश्रू आले. विश्वाची निर्मिती करताना परमेश्वर असे ही देवदूत पृथ्वीवर पाठवतो याची प्रचिती आली,” असं राजेंद्र जगदाळे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतात.

धनाजी यांच्या प्रामाणिकपणाची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर एका खासगी वृत्तवाहिनीने त्यांची मुलाखत घेतली तेव्हा पैसे परत करुन आपल्याला समाधान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शेतमजुरी करुन पोट भरणाऱ्या धनाजी हे एकटेच राहतात. त्यांचा मुलगा आणि पत्नी यांचे निधन झाले आहे. सध्या या व्हायरल पोस्टमुळे त्यांच्यावर गावकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.