कोणत्याही कंपनीचे नाव ही त्या कंपनीची ओळख असते. हे नाव थोडे हटके आणि अर्थपूर्ण असावे असा कंपनीचा प्रयत्न असतो. हे नाव सोपे आणि सुटसुटीत असावे यासाठी क्रीएटीव्ह टीम मोठ्या जोमाने काम करत असते. यासाठी अनेक सुपिक डोक्यातून विविध कल्पना समोर येत असतात. एकदा का हवे ते नेमके नाव मिळाले की मग कंपनीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते आणि ती कंपनी बाजारात आपले स्थान निर्माण करते. मग विशिष्ट कंपनीने आपले नाव तेच का ठेवले असेल हा विषय काहीसा मागे पडतो. पण चीनमधील ई-कॉमर्स कंपनीने आपल्या कंपनीचे नाव ‘अलीबाबा’ का ठेवले असेल? आलिबाबा आणि चाळीस चोर या लहानपणी ऐकलेल्या गोष्टीशी याचा काही संबंध आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा केलेला प्रयत्न…

‘अलीबाबा’ हा शब्द मूळ अरबी असून कालांतराने तो हिंदी भाषेत आला. हा शब्द उर्दू भाषेतही वापरला जातो. आता कंपनीने हेच नाव का निवडले त्याची माहिती कंपनीचे संस्थापक जॅक मा यांनी दिली होती. ते म्हणतात, ई-कॉमर्स कंपनी असल्याने याचा वापर जगभरात होणार हे माहित होते. जगाच्या कोपऱ्यातील प्रत्येक व्यक्तीला कळेल असे नाव असावे यासाठी या नावाची निवड केली. हे नाव निश्चित करण्यामागेही एक अतिशय रंजक गोष्ट आहे.

जॅक मा हे सॅनफ्रान्सिस्कोमधील एका कॉफी शॉपमध्ये बसले असताना त्यांनी तेथील वेट्रेसला “तू कधी अलीबाबा शब्द ऐकलायेस का? किंवा हा शब्द उच्चारल्यानंतर तुझ्या मनात पहिले काय येते?” असे विचारले. त्यावर तिनेही अतिशय उत्साहाने “ओपन सेसमी (खुल जा सिम-सिम)” असे उत्तर दिले. नंतर जॅक यांनी आसपासच्या जवळपास तीस लोकांना हा प्रश्न विचारला. यातील अनेकांना हा शब्द माहित होता. त्यामुळे आपण कंपनीचे हे नाव नक्की केले असे त्यांनी सांगितले.