विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचे आव्हान संपुष्टात आल्यापासून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. धोनीचे चाहते धोनीमध्ये अजूनही क्रिकेट शिल्लक आहे. त्याने इतक्यात निवृत्त होऊ नये, अशी मतं व्यक्त करत आहेत. पण धोनी मात्र विश्वचषकानंतर अद्याप क्रिकेटच्या मैदानावर उतरलेला नाही. धोनीने विश्वचषक स्पर्धेनंतर दोन महिन्यांची विश्रांती घेतली होती. या कालावधीत त्याने काश्मीरमध्ये जाऊन भारतीय लष्कराला सेवा दिली.

नोव्हेंबरमध्ये धोनी मैदानात परतेल असे वाटत असतानाच त्याला पुन्हा एकदा विश्रांती दिल्याचे सांगण्यात आले. IPL 2020 मध्ये धोनी आपल्या खेळीचा जलवा दाखवेल आणि झोकात टीम इंडियात पुनरागमन करेल अशाही चर्चा रंगल्या. पण दुर्दैवाने करोनामुळे IPL पुढे ढकलण्यात आले. अशा परिस्थितीत धोनी मैदानावर परतण्याऐवजी निवृत्ती जाहीर करणार अशी चर्चा पुन्हा रंगू लागली. ट्विटरवर #Dhoni Retires असा एक हॅशटॅगदेखील ट्रेंड झाल्यामुळे निवृत्तीची पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

या साऱ्या प्रकारावर धोनीची पत्नी साक्षी प्रचंड चिडली. तिने थेट आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रागाच्या भरात एक ट्विट केले. “या सगळ्या निव्वळ अफवा आहेत. लॉकडाउनमुळे सध्या काही लोकांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. म्हणून असला हॅशटॅग ट्रेंड होतोय. अशा लोकांनी आपल्या स्वत:च्या आयुष्यात लक्ष घालावं”, असे साक्षीने ट्विट केले.

या ट्विटवर अनेकांनी तिला शांत राहण्याचा सल्ला देत धोनीच्या समर्थनार्थ रिप्लाय दिले. पण काही वेळाने मात्र साक्षीने ते ट्विट डिलीट करून टाकले. ते ट्विट डिलीट करण्यामागचे कारण मात्र कळू शकले नाही.