जंगलातील प्राण्यांचे जीवन कसे असते, ते कसे राहतात, शिकार कशी करतात, त्यांच्या सवयी यांविषयी आपण कधीतरी टीव्ही चॅनलवर किंवा वेगवेगळ्या डॉक्युमेंट्रीजमधून पाहतो. हे दाखविता यावे यासाठी जंगलात अनेक दिवस बऱ्याचदा अनेक महिने कॅमेरे लावून अतिशय कठीण परिस्थितीत व्हिडिओग्राफरना बसून रहावे लागते. त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर आपल्याला या गोष्टी इतक्या सहज दिसू शकतात. तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस गोष्टी सोप्या होत असतानाच त्याचा अशाप्रकारच्या कामांसाठीही उपयोग होत असल्याचे दिसते आहे.

जंगली प्राणी टाकीमधून पाणी पिताना त्यांचे हावभाव काय असतात याचा अभ्यास जर्मनीत केला जातो आहे. यासाठी येथील एका जंगली प्राण्यांच्या उद्यानामध्ये प्राण्यांसाठी असणाऱ्या पाण्याच्या टाक्यांमध्ये कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे प्राण्यांचे पाणी पितानाचे भाव या कॅमेरांमध्ये टिपले जाणार आहेत. या उद्यानामध्ये ७०० प्रजातींचे एकूण ७००० प्राणी असून हे प्राणी पाणी कसे पितात त्याची नोंद होणार आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, या उद्यानामधील पाण्याच्या टाक्यांमध्ये कॅमेरांबरोबरच आरसेही बसविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे याचा व्हिडिओही समोर आला असून यामध्ये हे प्राणी पाणी पिताना आपले प्रतिबिंब दिसल्यावर कशापद्धतीने हावभाव करत आहेत ते दिसत आहे. या प्राण्यांना गुप्तपणे लावण्यात आलेला कॅमेरा आणि आरसा याबाबत काहीच माहित नसल्याने त्यांचे नैसर्गिक भाव टिपणे शक्य होते आहे.