एखाद्या कार्यक्रमासाठी बाहेर जायचं म्हटलं की स्त्रियांसमोर सगळ्यात मोठी समस्या असते ती म्हणजे नवीन साडी किंवा ड्रेस नसणे. मग अशावेळी आपल्या पतीला नवीन कपडे घेत नाही म्हणून वारंवार ऐकवणं, शॉपिंगसाठी तगादा लावणं सुरु होतं. पण मार्गेट ब्रॉकमन यांना आतापर्यंत कधीही ही समस्या जाणवली नाही. कारण त्यांचे 83 वर्षीय पती पॉल ब्रॉकमन जेव्हा कधी बाहेर जायचं असेल तेव्हा त्यांच्यासाठी नवीन ड्रेस विकत घेतात. गेल्या 57 वर्षांपासून पॉल असं करत असून आतापर्यंत त्यांनी पत्नीसाठी 55 हजार ड्रेस विकत घेतले आहेत.

एका कार्यक्रमात पॉल आणि मार्गेट यांची भेट झाली होती. रात्रभर दोघे एकत्र डान्स करत होते. यानंतर दोघे प्रेमात पडले. ‘मी जेव्हा कार्यक्रमात गेलो तेव्हा तिथे मार्गेट होती. आम्ही रात्रभर डान्स केला आणि प्रेमात पडलो’, अशी आठवण पॉल यांनी सांगितली. मार्गेट यांनी सांगितल्यानुसार, ‘आधीपासूनच पॉल यांचं म्हणणं होतं की एकच ड्रेस पुन्हा पुन्हा घालायचा नाही. त्यामुळे आम्ही जेव्हा कधी बाहेर जातो तेव्हा माझ्याकडे नवीन ड्रेस असतो’.

सुरुवातीला मार्गेट यांना पॉल यांच्या वागण्याचा राग येत असे. यामुळे पॉल नवीन ड्रेस विकत घेतल्यानंतर तो लपवून ठेवत असत आणि जेव्हा मार्गेट यांचा मूड चांगला असायचा तेव्हा तो बाहेर काढत. ‘एक ड्रेस पुन्हा का घालायचा?’, असं पॉल विचारतात. ‘तिला नवीन ड्रेसमध्ये पाहिल्यानंतर मला आनंद होतो’, असं पॉल सांगतात.

विशेष म्हणजे नवीन ड्रेसचं हे गुपीत मार्गेट यांच्याशिवाय इतर कोणालाही माहिती नव्हतं. पॉल यांनी एका गॅरेजमध्ये सर्व ड्रेस ठेवले होते. एके दिवशी गॅरेजचा दरवाजा त्यांनी चुकून उघडा ठेवला आणि त्यांच्या मुलीला याबद्दल कळलं. इतके ड्रेस जमा झाल्यानंतर आता नेमकं काय करायचा हा प्रश्न पॉल आणि मार्गेट यांच्यासमोर उभा राहिला होता. पण लगेचच त्यांना एक कल्पना सुचली.

‘पॉल यांनी हे ड्रेस दुसऱ्यांना द्यायचं ठरवलं जेणेकरुन गॅरेजमध्ये पडून राहण्यापेक्षा दुसरं कोणीतरी त्याचा वापर करेल असा विचार केला’, असं मार्गेट यांनी सांगितलं. त्यांनी हजाराहून जास्त ड्रेस आतापर्यंत विकले आहेत.