शरीरावर गोंदवून घेतलेल्या टॅटूमुळे गुन्हेगारी विश्वातल्या एका टोळीच्या म्होरक्याला पकडण्यात जपानी पोलिसांना यश आलं. एका वृद्ध व्यक्तीच्या सर्वांगावर असणारे टॅटू हे थायलंडमधल्या तरुणांच्या आकर्षणाचा विषय ठरले होते. या टॅटूचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यामातून तुफान व्हायरल झाले होते, हे फोटो जपानी पोलिसांपर्यंतदेखील पोहोचले. हे टॅटू म्हणजे फॅशन ट्रेंड नसून जपानमधल्या कुख्यात टोळींचं चिन्ह असल्याचं ओळखायला जपानी पोलिसांना वेळ लागला नाही. केवळ टॅटू आणि व्हायरल झालेल्या फोटोंवरून त्यांनी कैकवर्षांपासून फरार असलेल्या जपानी टोळीतल्या खूनी म्होरक्याचा शोध लावून त्याला ताब्यात घेतलं.

शिगेहुरी शिराई असं अटक करण्यात आलेल्या टोळीप्रमुखाचं नाव आहे. जपानमधल्या याकुझा टोळीचा तो प्रमुख होता. सट्टेबाजी, वेश्याव्यवसाय, मानवी तस्करी, सायबर हल्ले अशा अनेक गुन्हात या टोळीतले लोक गुंतले असतात. या टोळीतल्या प्रत्येक गुंडाच्या शरीरावर विशिष्ट पद्धतीनं टॅटू गोंदले असतात. तसेच टोळीतल्या गुंडानं चूक केली तर त्याची बोट छाटण्याची शिक्षाही या टोळीत प्रसिद्ध आहे. शिगेहुरीच्या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये याकुझा टोळीचा गोंदलेला टॅटू आणि त्याची छाटलेली बोट दिसत होती आणि यावरूनच जपानी पोलिसांनी थायलंड पोलिसांची मदत घेऊन या म्होरक्याला अटक केली. जपानमध्ये २००३ साली शिगेहुरीनं प्रतिस्पर्धी टोळीतल्या म्होरक्याचा खून केला होता. त्यानंतर तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. जपानमधून पळून गेल्यानंतर त्यांनं टोळीचं प्रमुखपद सोडलं होतं. पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर १३ वर्षांनंतर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं.