उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेतली. या गुप्त भेटीची चर्चा देशभर रंगली. अण्वस्त्र प्रसारबंदीची चर्चा यावेळी किम यांनी केली तसेच उभय देशातील संबंध सुधारण्यासाठी देखील ही भेट महत्त्वाची ठरली. यावेळी हुकूमशहा किम जोंग उन खास गडद हिरव्या रंगाच्या ट्रेननं चीनमध्ये आले असल्याच्याही चर्चा होत्या. २५ मार्चला उत्तर कोरियामधून ही विशेष गाडी चीनमध्ये दाखल झाली होती.

जपानच्या Nippon TV ने एक व्हिडिओ फुटेज प्रसारित केलंय. या फुटेजमध्ये किम यांच्या ट्रेनशी मिळते जुळती ट्रेन दिसत आहे. याच ट्रेननं किम यांचे दिवंगत वडिल किम जोगं इलनं चीनचा प्रवास केला होता असा कयास बांधला जात आहे. किम यांची हिरव्या रंगाची ट्रेन विशेष असल्याचं म्हटलं जात आहे. या ट्रेनमध्ये खास कॉन्फरन्स रूम, माहिती देण्यासाठी सॅटेलाईट फोन आणि टीव्हीची व्यवस्था आहे. यात इतरही सुविधा हुकूमशहाच्या दिमतीला तैनात असल्याचं दक्षिण कोरियाच्या वृत्तपत्रांनी म्हटलं आहे.

(छाया सौजन्य : ऱॉयटर्स)

या ट्रेनचा प्रत्येक डबा बुलेटप्रुफ असून त्याच्या खिडक्याही काळ्या रंगाच्या असतात त्यामुळे आत असलेल्या प्रवाशाबद्दल कमालीची गुप्तता राखण्यास मदत होते. किम यांचे वडिल किम जोंग इल यांच्या कार्यकाळातही अशा स्वरुपाच्या तीन ट्रेन धावत होत्या. त्यातल्या एका ट्रेननं ते स्वत: प्रवास करत असत. दोन दिवसांपूर्वी चीनमध्ये दाखल झालेल्या ट्रेननं किम यांनी प्रवास केला. किम यांच्या हुकूमावरून या ट्रेनचं इंटिरिअर एखाद्या पंचतारांकित हॉटेलप्रमाणे करण्यात आलं आहे. जगातील माहागडी फर्निचर, सोफे या ट्रेमध्ये आहेत.