अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासंदर्भातील एख पोस्ट सध्या सोशल नेटवर्कींगवर तुफान व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये बायडेन हे वॉर हिरो म्हणजेच निवृत्त सैनिक असून त्यांनी युद्धामध्ये मोठा पराक्रम केला होता असा दावा करण्यात आला आहे.

“जो बायडेन हे वॉर हिरो आहेत. त्यांनी स्वत:च्या पूर्ण रेजिमेंटची सुटका केली होती. तसेच त्यांनी शत्रूच्या तीन हजार सैनिकांनाही कैंद केलं होतं. या शौर्यासाठी त्यांना शौर्य पुरस्काराने गौरवण्यात आळं होतं. ते रोड्स स्कॉलर असून त्यांनी हार्वर्ड लॉ स्कूल मधून शिक्षण पूर्ण केलं असून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बोस्टनमध्ये कोट्यांवधींची लॉ फर्म सुरु यशस्वीपणे सुरु ठेवली आहे. त्यानंतर त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली. नासाच्या उभारणीमध्ये जो बायडेन यांचा महत्वाचा सहभाग आहे. त्यांनी होमलॅण्ड डिपार्टमेंटसाठी म्हणजेच पीस कॉप विभागाची स्थापना केली. त्यांनी ११ वेळा अर्थसंकल्प सादर केलाय,” असा दावा या व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे. २१ डिसेंबर रोजी शेअर करण्यात आलेली ही पोस्ट हजारोच्या संख्येने शेअर झाली आहे. मात्र करण्यात आलेले हे सर्व दावे खोटे असल्याचे एएफपी फॅक्टचेकने म्हटलं आहे.


यापूर्वी अशाप्रकारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासंदर्भातील मेसेजही व्हायरल झाले होते. त्यावेळीही त्यासंदर्भातील सत्य फॅक्टचेकर्सने समोर आणलं होतं. यंदा व्हायरल होत अशणाऱ्या पोस्टमधील मुद्दे चुकीचे कसे आहेत हे जाणून घेऊय़ात.

सैन्यात होते का?

या व्हायरल पोस्टमध्ये बायडेन हे वॉर हिरो असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यासाठी त्यांना मेडल ऑफ ऑनर पुरस्कार देण्यात आलाय. मात्र हा दावा खोटा आहे. बायडेन यांनी कधीच अमेरिकन लष्करासाठी काम केलेलं नाही. मेडल ऑफ ऑनर मिळवणाऱ्यांच्या यादीमध्ये बायडेन यांचे नाव नाही. तुम्ही ही यादी येथे क्लिक करुन तपासून पाहू शकता.

शिक्षण आणि कंपनी

ते रोड्स स्कॉलर असून त्यांनी हार्वर्ड लॉ स्कूल मधून शिक्षण पूर्ण केलं असून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बोस्टनमध्ये कोट्यांवधींची लॉ फर्म सुरु यशस्वीपणे सुरु ठेवली आहे, असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला असून हा दावाही चुकीचा आहे. रोड्स स्कॉलरच्या यादीमध्येही बायडेन यांचं नाव नाहीय. ही यादी तुम्ही येथे पाहू शकता. तसेच बायडेन यांनी कायद्याचं शिक्षण आणि पदवी ही सिराक्यूज विद्यापिठातून घेतली आहे हार्वर्ड विद्यापिठातून नाही. तसेच ते त्यांच्या बॅचमध्ये ८५ पैकी ७६ व्या स्थानी होते. ती बातमी तुम्ही येथे वाचू शकता. तसेच बायडे यांनी लॉ फर्म सुरु केली मात्र ती बोस्टमध्ये नाही तर डेलवेअरमध्ये.

नासाच्या स्थापनेमध्ये सहभाग?

नासाच्या उभारणीमध्ये जो बायडेन यांचा महत्वाचा सहभाग आहे. त्यांनी होमलॅण्ड डिपार्टमेंटसाठी शांतीदूत म्हणजेच पीस कॉप विभागाची स्थापना केली, असा दावाही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. इतर दाव्यांप्रमाणे हा दावाही खोटाच आहे. बायडे यांचा जन्म नोव्हेंबर १९४२ मध्ये झाला. नासाची स्थापना जुलै १९५८ मध्ये झाली. म्हणजेच नासाची स्थापना झाली तेव्हा बायडेन अवघ्या १५ वर्षांचे होते. तसेच त्यांनी १९७२ पर्यंत काँग्रेसकडून निवडणूक लढवली नव्हती. पीस कॉप विभागाची स्थापना माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ कॅनडी यांनी १९६१ साली केली होती. यासाठी त्यांनी विशेष आदेश जारी केला होता. याच्याही बायडेन यांचा प्रत्यक्ष काहीही संबंध नाहीय.

बायडेन यांनी ११ वेळा अर्थसंकल्प सादर केलाय, हा दावा सुद्धा चुकीचा आहे.