मोबाइल, दागिने, गाडया अशा महागडया वस्तुंची चोरी झाल्यानंतर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवणे स्वाभाविक आहे. पण मागच्या आठवडयात चेन्नईच्या सेक्रेटरीयंट पोलिसांना एक विचित्र अनुभव आला. अब्दुल हाफिज नावाच्या एका व्यक्तीने चप्पल चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. आपल्या घरातून चप्पल, बुटांचे १० जोड चोरीला गेले असून, त्याची किंमत ६० हजार रुपये असल्याचे त्याने तक्रारीत म्हटले आहे. अब्दुल हाफिज पेशाने व्यावसायिक आहे.

चोरी झालेले सर्व बूट ब्राण्डेड असून ते घराच्या दरवाजाजवळ ठेवलेले होते असे अब्दुलने सांगितले. किलपॉकमध्ये दिवान बहादूर शनमुगम मार्गावर अब्दुल हाफिजचे निवासस्थान आहे. अब्दुल घरी असतानाच शनिवारी सकाळी चोरीची ही घटना घडली.

अब्दुलने घरात प्रवेश करताना दरवाजाजवळ चप्पल आणि बूट पाहिले होते. तासाभराने जेव्हा तो बाहेर आला तेव्हा चप्पल आणि बुटांचे जोड चोरीला गेलेले होते. चप्पल आणि बुटांबरोबर सँडलही चोरी झाल्याचे त्याने सांगितले. शनिवारी रात्री त्याने अधिकृत तक्रार नोंदवली. अब्दुलने शेजाऱ्यांवर संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात अजून तपास सुरु केलेला नाही. शेजारी आणि अब्दुलच्या घरात काम करणाऱ्या नोकरांची ते चौकशी करणार आहेत. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासणार आहेत.