विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या गुरुवारी पुण्यात प्रचारसभा पार पडणार आहे. पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानात ही सभा पार पडणार असून त्यासाठी कॉलेजच्या परिसरातील झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. परिसरातील अनेक मोठी झाडे सोमवारी रात्री कापण्यात आली आहेत. सभेत अडथळा ठरणारी सर्व झाडे कापण्यात आली असून जमिनीचं सपाटीकरण करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाच्या निर्णयानंतर त्याच दिवशी रात्री आरे येथील मेट्रोच्या कारशेडसाठी मोठ्याप्रमाणात वृक्षतोड करण्यात आली. या वृक्षतोडीनंतर सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मॅन व्हर्सेस वाइल्ड या कार्यक्रमामध्ये बोलताना मोदींनी लाकडामध्ये जीव असतो असं वक्तव्य केलं होतं.

१२ ऑगस्ट रोजी प्रसारित झालेल्या डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रममध्ये मोदी सहभागी झाले होते. साहसवीर बेअर ग्रिल्सबरोबर मोदी उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भटकताना दिसले. या वेळी मोदींनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. बेअरच्या एका प्रश्नावर उत्तर देताना मोदींनी लाकूड आणि वनसंपदेसंदर्भात आपली मते मांडली होती.

लहानपणीची आठवण सांगताना मोदींनी लाकडाचं महत्व आणि पावित्र्य मोदींनी स्पष्ट केलं होतं. ‘आम्ही लहान असताना आमच्या एका काकांनी लाकडांचा व्यापर करण्याचा विचार केला. चूल पेटवण्यासाठी लागणाऱ्या लाकडाचा व्यापार करण्याच्या उद्देशाने काकांनी दुकानासाठी जागाही विकत घेतली. ज्यावेळी त्यांनी आमच्या आजीला याबद्दल सांगितलं तेव्हा आजीने याला विरोध केला. आपण उपाशी मरु, मजुरी करु पण लाकडं विकायची नाही असं आजीने काकांना सांगितलं. झाडांमध्ये आणि लाकडांमध्ये जीव असतो. आपण लाकूड कापू शकत नाही असं सांगत आजीने काकांना लाकूड विकण्याचं काम कधीच करु दिलं नाही. या प्रसंगावरुन दिसून येते की पर्यावरणाचे संवर्धन करणे हा आमच्या स्वभावाचा भाग असल्याचे दिसून येते,’ असं उत्तर मोदींनी दिले होते.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पुण्यातील प्रचारसभेसाठी एसपी कॉलेजच्या मैदानात व्यासपीठ उभारण्याचं काम सोमावारी रात्रीपासून सुरु आहे. यावेळी अडथळा ठरणारी जवळपास १५ ते १६ झाडे कापण्यात आली आहेत. आयोजकांनी सुरक्षेच्या कारणास्तव झाडं कापण्यात आली असल्याचं सांगितलं आहे.