‘मॅकडोनाल्ड्स’ या प्रसिद्ध फास्ट फूड चेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह ईस्टरब्रुक यांची कंपनीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. ‘मॅकडोनाल्ड्स’मधील एका कर्मचाऱ्याबरोबर संबंध असल्याच्या कारणावरुन त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

स्टीव्ह ईस्टरब्रुक यांचे त्या महिलेबरोबर असलेले नाते परस्पर संमतीचे होते. मात्र या नात्यामुळे कंपनीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांनी एका इमेलच्या माध्यमातून कंपनीतील कर्मचाऱ्यासोबत असलेल्या संबंधाची माहिती दिली. तसेच “कंपनीच्या धोरणांचा विचार करता, मी कंपनीच्या मंडळाशी सहमत आहे. आता इथून बाहेर पडण्याची वेळ आली आहे” असे म्हणत त्यांनी आपला राजीनामा दिला. आता यापुढे मॅकडोनाल्ड्स अमेरिकेचे प्रमुख ख्रिस केम्पिसिजन्स्की त्यांच्या जागी कंपनीची सूत्रं स्वीकारतील. गेल्याच वर्षी ‘इंटेल’ कंपनीचे प्रमुख ब्रायन क्रायनच यांनाही कंपनीतील कर्मचाऱ्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या कारणास्तव पदावरुन हटवण्यात आले होते.

कोण आहेत स्टीव्ह ईस्टरब्रुक?

स्टीव्ह ईस्टरब्रुक यांनी १९९३ साली लंडनमधील ‘मॅकडोनाल्ड्स’मध्ये व्यवस्थापक म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर २०११ साली ते ते ‘पिझ्झा एक्स्प्रेस’ आणि ‘वागामामा’ या आशियाई फूड चेनच्या प्रमुखपदी गेले. परंतु २०१५ साली ते पुन्हा एकदा मॅकडोनाल्ड्स’ कॉर्पोरेशनमध्ये परतले. यावेळी त्यांची कार्य क्षमता पाहून आणि अनुभव पाहून त्यांना कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांना वर्षाला १५ लाख ९० हजार अमेरिकी डॉलर्स इतके वेतन मिळत होते. इतक्या जास्त वेतनामुळे ते नेहमीच चर्चेत असायचे.