सगळीकडेच शाही विवाहसोहळ्याची चर्चा सुरू आहे. मेगन आणि प्रिन्स हॅरीच्या विवाहसोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. या आठवड्यात पार पाडणाऱ्या या भव्य सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. यानिमित्त विंडसर येथील ग्रँड युनियन पार्कमध्ये विंडसर कॅसलची लिगो ब्रिक्सपासून तयार केलेली मिनिएचर प्रतिकृती उभारण्यात आली आहे. १९ तारखेला शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. खरं तर शाही घराण्यातील परंपरेप्रमाणे शाही विवाहसोहळ्यासाठी सोमवार ते शुक्रवारमधील एखादा दिवस निवडला जातो. पण ही परंपरा मोडून या जोडप्यानं शनिवारी लग्नगाठ बंधण्याची ठरवली आहे.

या सोहळ्यानिमित्त ८ मॉडेल मेकर टीमनं तब्बल ५९२ तास राबून विंडसर कॅसलमधला शाही विवाहसोहळ्याचा देखावा उभारला आहे. विंडसर कॅसल तयार करण्यासाठी ८ कारागीरांची अखंड मेहनत होतीच यासाठी त्यांनी तब्बल ३९,००० हजार लिगो विटा वापरल्या. इतकंच नाही तर या करागीरांनी बग्गीत बसलेल्या प्रिन्स हॅरी मेगन मार्केल यांचंही मिनीऐचर तयार केलं.

विंडसर कॅसलमधील शाही विवाहसोहळ्याचा उभारलेला कलेचा उत्कृष्ट नमुना पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली आहे. ज्यांना हे पाहणं शक्य नाही त्यांच्यासाठी खास व्हिडिओही तयार करण्यात आला आहे जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.