अनेकदा भारतात प्राण्यांवर अत्याचाराच्या घटना आपण ऐकत असतो, पाहत असतो. अनेकदा पाळीव प्राण्यांना अत्यंत क्रूर पद्धतीने इजा पोहचवली जाण्याचे प्रकारही आपल्या वाचनात आले असतील. केरळमध्ये माणुसकीला काळीमा फासणारा एक संतापजनक प्रकार घडला आहे. केरळच्या पलक्कड जिल्ह्यात स्थानिकांनी एका गर्भवती हत्तीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला दिला. हा अननस पोटात फुटल्यामुळे या हत्तीणीचा अखेरीस मृत्यू झाला आहे. केरळच्या पलक्कड भागात फॉरेस्ट ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या मोहन क्रिश्नन या अधिकाऱ्याने फेसबूक पेजवरुन हा प्रसंग उजेडात आणला आहे.

“हे फळ खाल्ल्यानंतर ते तिच्या पोटात फुटलं. हा धमाका इतका मोठा होता की हत्तीणीची जीभ आणि तोंडाला चांगलीच दुखापत झाली होती. या वेदना आणि भूक सहन होत नसल्यामुळे हत्तीण गावांमधून सैरावैरा पळत होती. या वेदनेमुळे तिला काहीही खाता येत नव्हतं. अशाही परिस्थितीत तिने एकाही व्यक्तीला इजा पोहचवली नाही. एकही घर तिने तुडवलं नाही. मला तरी ती एखाद्या देवीप्रमाणेच वाटली.” मोहन क्रिश्नन यांनी मल्याळम भाषेत हा घटनाक्रम आपल्या फेसबूक अकाऊंटवर मांडला आहे. स्थानिक लोकांनी तिला हे फळ खायला दिलं असेल असा अंदाज मोहन क्रिश्नन यांनी व्यक्त केला आहे. २७ मे रोजी हा दुर्दैवी प्रकार घडला असून मोहन क्रिश्नन यांच्या फेसबूक पेजवरील पोस्ट आणि फोटो व्हायरल झाल्यामुळे ही माहिती प्रसारमाध्यमांसमोर आली.

काही वेळाने ही हत्तीण वेलियार नदीच्या किनारी पोहचली आणि ती पाण्यात जाऊन उभी राहिली. मोहन क्रिश्नन यांच्या मते आपल्या जखमेवर माशा किंवा इतर किटक बसू नयेत यासाठी हत्तीणीने आपली सोंड पाण्यात बुडवली होती. या हत्तीणीला बाहेर काढण्यासाठी स्थानिक वन अधिकाऱ्यांनी दोन Rapid Response Team मागवल्या होत्या. मोहन याच टीमचे सदस्य होते. या हत्तीणीला बाहेर काढण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी इतर दोन हत्तींना घटनास्थळावर आणलं, पण तरीही या हत्तीणीने बाहेर न येणं पसंत केलं. वन अधिकाऱ्यांनी हत्तीणीला बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले परंतू अखेरीस दुपारी ४ वाजल्याच्या दरम्यान हत्तीणीने आपले प्राण सोडले.

अखेरीस ट्रक मागवून वन अधिकाऱ्यांनी तिला बाहेर काढलं. ज्या जागेवर ही हत्तीण मोठी झाली तिकडेच वन-अधिकाऱ्यांनी तिच्यावर अंतिम संस्कार केले. ज्या डॉक्टरने हत्तीणीचं पोस्टमार्टम केलं, त्यानेच ती गर्भवती असल्याचं सांगितलं. तिच्या डोळ्यातली निराशा मला तेव्हाही दिसत होती. आम्ही सर्वांनी तिच्यावर अंतिम संस्कार करत तिला श्रद्धांजली वाहिली असं मोहन क्रिश्नन यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.