देशातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असणाऱ्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर अनेक शाळांनी, विद्यापिठांनी ऑनलाइन क्लासेस आणि लेक्चर्सची सुरुवात केली आहे. मात्र असं असलं तरी देशातील अनेक भागांमध्ये इंटरनेट कनेक्टीव्हीटी आणि रेंज मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांना या ऑनलाइन माध्यमातून शिक्षण घेतला अडचणी येत असल्याचे चित्र दिसत आहे. इंटरनेट नसणे किंवा इतर तांत्रिक कारणं देत काहीजण अशा ऑनलाइन क्लासलाही दांडी मारत असतानाच रेडिओ आणि टीव्हीच्या माध्यमातूनही वर्ग घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र असं असलं तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा मार्गाने शिक्षण घेण्यात जास्त कष्ट करावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. असाच एक प्रकार राजस्थानमध्ये समोर आला आहे. राजस्थानमधील एक विद्यार्थी रेंज मिळत नाही म्हणून रोज डोंगरावर जाऊन अभ्यास करत आहे.

नक्की वाचा >> …म्हणून ती कौलारू घराच्या छप्परावर चढून करते ‘बीए’चा अभ्यास

हरीश असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी आहे. हरीश हा बाडमेर येथील दरुरा गावामध्ये राहतो. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार दरुरा गावामध्ये मोबाइलला रेंज येण्यामध्ये अडथळा आहे. त्यामुळेच मागील दीड महिन्यापासून हरीश रोज सकाळी ८ वाजता गावाजवळच्या डोंगर माथ्यावर जातो. तिथे सकाळी ८ ते दुपारी २ असे सहा तास ऑनलाइन लेक्चरला हजेरी लावल्यानंतर तो पुन्हा घरी येतो. मागील दीड महिन्यापासून हरीशचा हा दिनक्रम सुरु आहे. डोंगर माथ्यावर एकही झाड नसल्याने हरीशला उन्हामध्ये बसूनच अभ्यास करावा लागतो. मात्र त्याने स्वत:च्या सोयीसाठी डोंगर माथ्यावर एक टेबल आणि खुर्ची नेऊन ठेवली आहे.

नक्की वाचा >> ऑनलाइन शिक्षणासाठी मुलीला स्मार्टफोन घेऊ न शकल्याने शेतकरी बापाची आत्महत्या

अशाप्रकारे ऑनलाइन शिक्षणसाठी आणि नेटवर्कच्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत असल्याचे हे काही पहिलं उदाहरण नाही. यापूर्वीही पश्चिम बंगालमधील काही ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाइन लेक्चरला हजेरी लावण्यासाठी मोबाइलला रेंज यावी म्हणून झाडांवर चढून अभ्यास करावा लागत असल्याचे वृत्त समोर आलं होतं. केरळमधील नमिथा नारायणन् ही बीएच्या शेवटच्या वर्षाला असणारी मुलगीही छप्परावर जाऊन अभ्यास करत असल्याची बातमी समोर आली होती. नमिथा पाचव्या सेमिस्टरचा अभ्यास करत आहे. मात्र तिच्या घरामध्ये मोबाइल इंटरनेटला चांगली रेंज येत नसल्याने ऑनलाइन लेक्चर पाहताना खूपच अडचणी येतात. त्यामुळेच चांगली रेंज मिळण्याची जागा शोधत शोधत नमिथा थेट घराच्या छप्पारावर जाऊन अभ्यास करते.