रिलायन्स जिओ सर्व्हिसने बाजारात आल्याबरोबर धुमाकूळ घातला होता. त्यांच्या फ्री डेटा प्लॅनने भल्याभल्यांची झोप उडवली. प्रचंड स्पीडने हाय क्वालिटी डेटा मिळत असल्याने ग्राहकांच्या त्याच्यावर उड्या पडल्या. मोबाईल मार्केटही ढवळून निघालं. बाकीच्या कंपन्या गपगार झाल्या आणि त्यांनी स्पर्धेत उतरण्याटची तयारी सुरू केली. मग या कंपन्यांनीही डेटा प्लॅन्सचे दर कमी करणं सुरू केलं. आणि ग्राहकांची आणखीच चंगळ झाली.

पण या सगळ्या स्पर्धेचा फायदा एका तिसऱ्यालाच मिळालाय. रिलायन्स जिओ लाँच झाल्यानंतर फेसबुकच्या भारतातल्या अॅक्टिव्ह यूझर्सच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झाली असं वृत्त टाईम्स नेटवर्कने दिलं आहे.

फेसबुकने डिसेंबरपर्यंतच्या तिमाहीचे आकडे जाहीर केले. त्यामध्ये त्यांच्या दर महिन्यातल्या अॅक्टिव्ह यूझर्सच्या संख्येत तसंच दर दिवशीच्या अॅक्टिव्ह यूझर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं त्यांनी जाहीर केलं. ही तिमाही आमच्यासाठी फँटास्टिक ठरल्याचं फेसबुकने म्हटलंय.

याच काळात जगातल्या सगळीकडेच फेसबुकच्या अॅक्टिव्ह यूझर्सच्या संख्येत वाढ झाली होती पण यातला फार मोठा घटक भारतातल्या यूझर्सच्या संख्येतल्या वाढीचा होता हे फेसबुकचे चीफ फायनान्स आॅफिसर डेव्हिड वेनर यांनी स्पष्ट केलं. भारतातल्या अॅक्टिव्ह यूझर्सच्या संख्येत झालेल्या वाढीमध्ये ‘एका दुसऱ्या कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या फ्री इंटरनेट’चा मोठा हात असल्याचं त्यांनी ‘रिलायन्स’चं नाव न घेता जाहीर केलं

जगात फेसबुकचे सगळ्यात जास्त यूझर्स भारतात आहेत. भारतातल्या यूझर्सची संख्या अमेरिकेतल्या यूझर्सपेक्षाही जास्त आहे. अमेरिकेपेक्षा भारतात ४० लाख जास्त फेसबुक यूझर्स आहेत. अमेरिकेनंतर ब्राझील आणि इतर विकसनशील देशांमधल्या फेसबुक यूझर्सची संख्या जास्त आहे.

रिलायन्स जिओ ने भारतीय बाजारपेठ काबीज करण्याच्या दृष्टीने मार्केटमध्ये दमदार एंट्री मारली खरी पण त्यानंतर उडालेल्या धुरळ्यात तिसऱ्याच कंपनीचा फायदा झाल्याचं दिसून येतंय.