बंगळुरूमधील रस्त्यांवरील खड्यांच्या समस्येचा निषेध नोंदवण्यासाठी येथील एका अवलिया कलाकाराने हटके युक्ती केली आहे. त्याने बंगळुरातील तुंगानगरमधील दयनीय अवस्था झालेल्या रस्त्यांमुळे नागरिकांसह वाहनधारकांना होणाऱ्या त्रासाबद्दल आगळावेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे. रविवारी रात्री या परिसरातील खड्डेमय रस्त्यांवर नागरिकांना अंतराळवीराच्या पोशाखात एक व्यक्ती चालताना दिसला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. यामध्ये हा व्यक्ती चंद्रावरील पृष्ठभागावर चालत असल्याचा पाहणाऱ्यास भास होतो. कारण चंद्रावरील पृष्ठभागाप्रमाणे येथील खड्डेमय रस्त्यांची अवस्था झालेली आहे, शिवाय या व्यक्तीने हुबेहुब अंतराळवीराचा पोशाख परिधान केलेला आहे.

बादल नानजुंदास्वामी असे या व्यक्तीचे नाव असून तो एक कलाकार आहे. हा व्हिडिओ पाहून एकाने ट्विट केले आहे की, ”खड्डे एवढे मोठे आहेत की इस्रो सहजरित्या आपल्या अंतराळवीरांना या ठिकाणी प्रशिक्षण देऊ शकेल, ज्यामुळे चंद्रावरील आणखी एक यशस्वी मोहिम आखता येईल.”

या अगोदरही बादल यांनी नागरी समस्यांना प्रकाशात आणण्यासाठी आपल्या कलेचा वापर केलेला आहे. त्यांनी या अगोदर स्थानिक अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी येथील रस्त्यांवरी मोठाल्या खड्ड्यांवर आपल्या कलेद्वारे मगर साकारली होती.

बादल यांनी ट्विट केले आहे की, अशी असंख्य उदाहरणं आहेत, जेव्हा कलेच्या माध्यामातून केल्या गेलेल्या मूक विरोधाने समस्येकडे लक्ष वेधल्या गेले आहे. आता अशी आशा करू शकतो की बंगळुरू महापालिकेने याकडे लक्ष दिले तर तुंगानगर येथील रस्त्यांची कामं मार्गी लागतील.