मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील रहिवासी 19 वर्षीय रामेश्वर गुर्जर या तरुण धावपटूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये रामेश्वर गुर्जर हा तरुण अनवाणी पायांनी 100 मीटरचं अंतर अवघ्या 11 सेकंदांमध्ये पूर्ण करताना दिसतोय. व्हायरल झालेल्या या व्हिडिओने मध्य प्रदेशच्या राज्य सरकारनंतर आता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचंहीही लक्ष वेधलंय.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी क्रीडामंत्र्यांना ट्विटरवर टॅग करुन या तरुणाला योग्य संधी आणि योग्य व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावं अशी मागणी केली होती. त्यानंतर वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या तरुणाचा हा व्हिडिओ पाहून खुद्द क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनाही या तरुणाची भुरळ पडल्याचं दिसतंय. कोणीतरी या तरुणाला माझ्याकडे घेऊन या, मी त्याची व्यवस्था अॅथलिट अकादमीत करेन असं प्रत्युत्तर रिजिजू यांनी ट्विटरद्वारे शिवराज सिंह चौहान यांना दिलं आहे.

यापूर्वी मध्य प्रदेशचे क्रीडामंत्री जीतू पटवारी यांनीही रामेश्वर याला भोपाळमध्ये उत्तम प्रशिक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे. अशा प्रतिभावान तरुणाला जर योग्य सुविधा, दर्जेदार बूट आणि चांगलं प्रशिक्षण मिळालं तर तो 100 मटरचं अंतर केवळ नऊ सेकंदांमध्ये पूर्ण करु शकतो, असं पटवारी यांनी म्हटलं होतं. रामेश्वर गुर्जरने 10 वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे. त्याच्या कुटुंबात आई-वडिल आणि पाच बहिण-भाऊ असून सगळं कुटुंब शेती करतं. आर्थिक स्थिती चांगली नसल्याने शिक्षण अर्धवट सोडण्याची त्याच्यावर वेळ आली. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून नेटकऱ्यांकडून जमैकाचा विश्वविक्रमवीर धावपटू उसेन बोल्ट याच्याशी त्याची तुलना केली जात असून हा भारताचा उसेन बोल्ट होऊ शकतो अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तर हा मध्य प्रदेशचा उसेन बोल्ट असल्याचं म्हटलं असून सरकारने अशा प्रतिभावान तरुणांची योग्य ती काळजी घ्यायला हवी असं म्हटलं आहे. २००९ साली वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतीम फेरीत बोल्टने १०० मीटरचे अंतर ९.५८ सेकंदांमध्ये पूर्ण केले होते.