मेहनतीच्या जोरावर आपण शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो असं म्हणतात. मेहनतीला कोणतीही तोड नाही. विशाल समजिस्कर हे असंच एक नाव. त्यांचं नाव प्रकाशझोतात तेव्हा आलं जेव्हा एका युझरनं त्यांची कहाणी सोशल मीडियावर शेअर केली. विशाल हे स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉयमधून काम करतात. परंतु ते एक उत्तम चित्रकारही आहेत. निखिल नाव्याच्या एका नेटकऱ्यानं त्यांची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. विशाल आणि निखिल यांचं जेव्हा बोलणं झालं त्यावेळी त्यांनी आपली कहाणी निखिल यांना सांगितली. निखिल यांनी त्यांची कहाणी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेकांनी त्यांची स्तुती केली.

निखिल यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे. हे विशाल आहेत ज्यांनी माझी स्विगीची ऑर्डर माझ्यापर्यंत पोहोचवली. ते एक आर्टिस्टही आहेत आणि ते कामाच्या शोधात आहेत. जर तुमच्याकडे काम असेल तर मला सांगा. मी तो संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवेन. त्यांची मदत करा, अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं आहे. काही वेळातच त्यांचं हे ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आणि अनेकांनी त्यांच्या ट्वीटरला रिट्वीट केलं.

इतकंच काय तर स्विगीनंही विशाल यांची कहाणी त्यांच्या फेसबुक पेजवरून शेअर केली आहे. विशाल सामजिस्कर यांना भेटा. आपली कला जिवंत ठेवण्यासाठी हा कलाकार स्विगीमध्ये पार्ट टाईम डिलिव्हरी बॉयचं काम करत आहे, असं स्विगीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.