थायलंडमधील एका व्यक्तीने मानवतेचा आणि भूतदयेचं मूर्तीमंत उदाहरण आपल्या कृतीमधून दाखवून दिलं आहे. येथील २६ वर्षीय माना श्रीवाते हा तरुण आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये काम करतो. तो मदतकार्य करणारा जवान आहे. त्याने आतापर्यंत अनेक लोकांचा जीव वाचवाला आहे. मात्र नुकताच त्याने केलेला कारनामा हा चर्चेचा विषय ठरत आहे. थायलंडमधील चंथाबुरी येथे एका रस्त्यावर रात्रीच्या वेळी एका बाईकस्वाराने हात्तीच्या पिल्लाला धडक दिली. या अपघातामध्ये हत्तीचं पिल्लू गंभीर जखमी झालं आणि रस्त्यावरच आडवं पडलं.

हात्तीच्या पिल्लाला मदत करण्यासाठी माना पुढे धावाला. त्याने प्रसंगावधान दाखवून हात्तीच्या पिल्लाला वाचवलं. तेथे उपस्थित असणाऱ्या एका व्यक्तीने या साऱ्या घटनेचा व्हिडीओ काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. तेव्हापासून हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला असून मानाचे अनेकांनी कौतुक केलं आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या मधोमध जखमी अवस्थेत पडलेल्या हत्तीच्या पिल्लाच्या पोटावर माना जोर देताना दिसत आहे. सीपीआर पद्धतीने या हत्तीच्या पिल्लाला श्वास घेण्यासाठी माना मदत करताना दिसत आहे.

रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये मानाने, “मानवी शरीर आणि काही व्हिडीओ पाहून मी हत्तीचं हृदय कुठे असेल याचा अंदाज लावला. मी या प्राण्याचा जीव वाचवू शकतो असं मला वाटलं आणि मी त्याच्या मदतीला धावतो. मी त्या हत्तीच्या पिल्लाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होतो त्याच वेळी त्याच्या आईचा आणि कळपातील इतर हत्तींचा आवाज येत असल्याने मला जरा भीती वाटत होती. जेव्हा हे हत्तीचं पिल्लू उठून चालू लागलं तेव्हा त्याला पाहून मला रडू कोसळलं,” अशी प्रतिक्रिया दिली.

मानाने दहा मिनिटं त्या हत्तीच्या पिल्लाला उठवण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले. त्याच्या प्रयत्नांना यश आलं अन् हत्तीचं पिल्लू स्वत:च्या पायावर उभं राहिलं. त्यानंतर या पिल्लाला दुसऱ्या ठिकाणी प्राण्यांच्या रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार करण्यात आले.

सीपीआर म्हणजे का?

सीपीआरचा फूल फॉर्म असतो कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन. आपत्कालीन परिस्थितीमध्ये हे तंत्र वापरलं जातं. एखाद्या व्यक्तीचा श्वास बंद पडून ती बेशुद्ध पडली असेल तर तिचा जीव वाचवण्यासाठी हे तंत्र वापलं जातं. सीपीआर देताना व्यक्तीच्या छातीवर हाताने दाब दिला जातो. त्यामुळे शरीरामध्ये शुद्ध रक्त पुन्हा वाहू लागतं.