TikTok स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांनी सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सोनाली हरयाणातील हिसार जिल्ह्यातील एका मार्केट कमिटी सचिवाला चपलेने मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणजिसिंह सुरजेवाला यांनी सोनाली फोगट यांना टीकेचं लक्ष्य केलंय. हरयाणामध्ये सरकारी नोकरी करणं गुन्हा आहे का? असा सवाल सुरजेवाला यांनी विचारला आहे.


सोनाली फोगट या 2019 च्या हरयाणा विधानसभा निवडणूकीत आमदपूर मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर लढल्या होत्या. मात्र, काँग्रेसचे आमदार कुलदीप बिश्नोई यांनी त्यांचा पराभव केला होता. शुक्रवारी सोनाली फोगट हिसारमधील बालसामंद मंडी या मार्केटमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी ही घटना घडल्याची माहिती आहे.

तिथे मार्केट कमिटीचे सचिव सुलतान सिंह यांच्यासोबत त्यांचा वाद झाला. त्यानंतर सुलतान सिंह यांना सोनाली चपलेने मारहाण करताना दिसत आहेत. ‘तू मला शिवीगाळ करण्याची हिंमत कशी केलीस’, असं म्हणत त्या सिंह यांना मारहाण करतायेत. सोनाली या त्यांच्या भागातील काही शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन धान्य मार्केटमध्ये गेल्या असता हा वाद झाल्याची माहिती आहे. दरम्यान याप्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप केले जात असून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.