ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटला पहिल्यांदाच नफा झाला आहे. इतर सोशल मीडिया साईट्ला मागे टाकत पहिल्या तीन महिन्यात ट्विटरनं अपेक्षेपेक्षा जास्त नफा कमावला आहे. ट्विटरनं ९१ मिलियन डॉलर म्हणजे ५८५ कोटी कमावले आहेत. १२ वर्षांनंतर पहिल्यांदा ट्विटरला इतका नफा झाल्याचं म्हटलं जात आहे.

सध्या जगभरात ट्विटरचे ३३ कोटी अॅक्टीव्ह युजर्स आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत ट्विटरच्या अॅक्टिव्ह युजर्सच्या संख्येत ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ट्विटरवर जास्त सक्रीय असणाऱ्या लोकांमध्ये सेलिब्रिटी, राजकारणी यांची संख्या जास्त आहे पण अजूनही सामान्य लोक ट्विटर वापरण्यासाठी सरसावले नाहीत, अनेक तरुणपिढी ट्विटरचा अन्य सोशल मीडियाच्या तुलनेत कमी वापर करत असल्याचं समोर आलं आहे आणि याचाच परिणाम ट्विटरच्या उत्पन्नावर झालेला दिसून येत आहे.

ट्विटरनं गेल्या वर्षभरात खूप चांगली प्रगती केली आहे. २०१७ मध्ये ट्विटरवर मेहनत घेण्यात आली त्याचाच फायदा ट्विटर झाला असल्याचं ट्विटरचे मुख्य अधिकारी जॅक डॉर्सीनं सांगितलं आहे. पण ट्विटरला हा फायदा युजर्समुळे नाही तर कॉस्ट कटिंगमुळे झाला असल्याचं अनेकांनी मत मांडलं आहे. कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या तीन महत्त्वाच्या आर्थिक सवलतींमध्ये कंपन्यांनी कपात केली आहे आणि त्यामुळे कंपनीला फायदा झाल्याचं काही वेबसाईट्चं म्हणणं आहे . पण, कंपनीच्या नफ्याचं कारण काहीही असलं तरी शेअर मार्केटमध्ये मात्र ट्विटरच्या शेअर्सचा भाव वधारला आहे.