सौदी अरेबियाची असलेल्या आणि कुवेतमधून पळून गेलेल्या १८ वर्षाच्या तरुणीला बँकॉक विमानतळावर अडवण्यात आले. राहफ मोहम्मद अल-क्यूनून असे तिचे नाव आहे. विमानतळावरील अधिकारी तिला तिच्या कुटुंबियांकडे परत पाठवण्याचा प्रयत्न करत होते. राहफ आपल्या कुटुंबियांबरोबर कुवेत येथे फिरायला गेली होती. आपल्याला आपल्या आई-वडिलांकडे परत जायचे नाही यासाठी मला मदत करा असे आवाहन तिने ट्विटरद्वारे केले होते. बँकॉकद्वारे प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना मला कुवेतला पाठवण्याचा निषेध करण्याचे आवाहन तिने केले होते. मी पुन्हा जर माझ्या कुटुंबियांकडे गेले तर ते मला मारुन टाकतील असेही तिने आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले होते.

सुरुवातीला रहाफ हिला कुवेतला पाठवण्यासाठी थायलंडचे पोलीस तयारी करत होते. मात्र तिने केलेल्या ट्विटवर तिला असंख्य प्रतिक्रिया आल्या आणि अनेकांनी तिला तिच्या कुटुंबियांकडे न सोडण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे याचा अतिशय चांगला फायदा झाला असून तिला परत न पाठवण्याचा निर्णय थायलंड विमानतळावरील अधिकाऱ्यांनी घेतला. तिच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचेही सांगण्यात आले. सुरुवातीला मी माझी कैफीयत मांडण्यासाठी निर्वासित असे स्टेटस टाकले होते. त्यामुळे मी माझ्या कुटुंबियांपासून वाचू शकले. मला कॅनडा, युनायटेड स्टेटस, ऑस्ट्रेलिया, लंडन या देशाच्या अधिकाऱ्यांनी संरक्षणासाठी संपर्क करावा असे आवाहनही तिने ट्विटद्वारे केले आहे. तिच्याकडे आवश्यक ती कागदपत्रे नसल्याचे थायलंड विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.