शिर्षक वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल, पण हे खरे आहे. ४८ वर्षे सोबत राहील्यानंतर उदयपूर येथील एका जोडप्याने लग्न केले आहे. तेही आपल्या नातवंडांसमोर. देवादास कालासुआ आणि मगडू बाई यांची ही कहाणी काहीशी हटके आहे. हे जोडपे इतकी वर्षे लग्न न करताच लिव्ह इन रिलेशनशिपप्रमाणे राहीले. लग्नाच्या वेळी देवादास यांचे वय होते तब्बल ८० वर्षे आणि त्यांच्या पत्नीचे ७६. पण प्रेम आणि एकमेकांची चांगली साथ असेल तर त्याला लग्नाच्या सोपस्कारांची आवश्यकता नसते हे या दोघांनी दाखवून दिले आहे.

देवादास यांचे लग्न झालेले असताना त्यांनी आपल्या शेजारच्या गावात राहणाऱ्या मगडूबाई यांना पळवून आणले होते. समाजाने देवादास यांच्या या कृत्याला कधीच मान्यता दिली नाही. त्यावेळी ते आपली पहिली पत्नी चंपाबाई आणि त्यांच्या मुलांसोबत रहात होते. त्यानंतर चंपाबाई आपल्या मुलांसोबत वेगळ्या राहत असल्या तरीही त्यांचे मगडूबाईसोबत असलेले संबंध अतिशय सौदार्हाचे होते. कालांतराने मगडूबाईचे आणि देवादासचे नाते फुलू लागले. त्यांना मुले झाली, त्या मुलांची लग्ने होऊन त्यांनाही मुले झाली. त्यानंतर अचानक आपण लग्न केले नसल्याचे त्यांना आठवले आणि या जोडप्याने ४८ वर्षांच्या सोबतीनंतर लग्न करायचे ठरवले आणि ते केलेही.

विशेष म्हणजे मगडूबाई यांच्या माहेरचे लोकही या लग्नाला उपस्थित होते. यावेळी नेहमीच्या लग्नाप्रमाणे सर्व रितीरिवाज करुन हे लग्न पार पाडण्यात आले. त्यामुळे एकीकडे काही वर्षं सोबत राहून एकमेकांची सोबत नाकारणाऱ्यांसाठी या जोडप्याचे उदाहरण अतिशय उत्तम आहे. या लग्नाला देवादास यांच्या पहिल्या पत्नी चंपाबाईही यांनीही परवानगी दिली होती. मात्र तब्येत बरी नसल्याने त्या लग्नाला उपस्थित राहू शकल्या नाहीत असे सांगण्यात येत आहे.