लग्नाच्या हंगामाला सुरूवात झाली आहे. हल्ली लग्नसोहळ्यातले प्रत्येक क्षण कॅमेराबद्ध करण्याचा नवा ट्रेंड सुरू झालायं, या आठवणी आयुष्यभर फोटोच्या रुपात जपता याव्यात यासाठी प्री वेडिंग, वेडिंग फोटोग्राफीसाठी जोडपं वाट्टेल तेवढे पैसे खर्च करायला तयार होतात. फोटोशूटसाठी साधरण अनेक जोडप्यांची पसंती ही समुद्रकिनाऱ्याला असते. समुद्रकिनाऱ्यासारख्या निसर्गरम्य ठिकाणी फोटो छान येतात. अशा ठीकाणी फोटोशूट करताना काळजी घेणेदेखील गरजेचे असते. तुम्हीही वेडिंग शूटसाठी समुद्रकिनारा शोधत असाल तर खबरदारी म्हणून हा व्हिडिओ जरूर पाहा.

खूशखबर! २०१८ मध्येही कर्मचाऱ्यांवर सुट्ट्यांचा ‘पाऊस’

सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत असलेल्या या व्हिडिओमध्ये फोटोशूट करताना काय करू नये हे उदाहरणासह दाखवलं आहे. चांगला आणि हटके फोटो यावा यासाठी जोडपं धोका पत्करून समुद्रात थोडं खोलवर जातात, फोटोसाठी छानशी पोजही देतात, हे सारं छान सुरळीत सुरू असताना लाटेचा तडाखा दोघांना बसतो अन् बिचारे पाण्यात पडतात, नवीन कपडे, नवरीचा वेडिंग गाऊन एक क्षणात खराब होऊन जातो. सुदैवाने फोटोग्राफरच्या चमूमधले लोक मदतीसाठी धावून येतात त्यामुळे हे दोघंही वाचतात. आता प्रत्येकजण यांच्यासारखं सुदैवी असंतच असं नाही, तेव्हा ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ म्हणीप्रमाणे आपण यातून धडा घेतला तर आपल्यासोबत असा प्रकार घडणार नाही. नाहीतर यांच्यासारखा आपलाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायला वेळ लागणार नाही हे नक्की!